उन्हाची तीव्रता वाढल्याने लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किरकोळ बाजारात मध्यम आकाराचे एक लिंबू पाच रुपये, तर मोठ्या आकाराचे लिंबू ७ ते १० रुपये दराने विकले जात आहे.
उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाहीलाही होते. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लिंबूपाणी, थंड पेय, ताक, लस्सी, उसाचा रस यांची मागणी वाढते. त्यातही लिंबूपाण्याला प्राधान्य असते.
त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, जानेवारीत ३ रुपये दराने विकले जाणारे लिंबू मार्चअखेर १० रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे लिंबूपाणी १५ रुपये आणि लिंबूसोडा ३० रुपयांवर गेला आहे. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून, या कालावधीत लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळीचा तडाखाअवकाळी पावसाचा फटका लिंबू पिकाच्या हस्त बहराला बसला. योग्य प्रमाणात फूल आणि फळधारणा झाली नाही. परिणामी, बाजारात लिंबाची आवक मंदावली आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश राज्यात लिंबाचे जादा उत्पादन होते; पण यंदा कर्नाटकसह इतर राज्यांत दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उत्पादन घटल्याचे व्यापारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.
लिंबू दरात दीडपट वाढगेल्या वीस वर्षापासून भाजीविक्रीत असलेल्या शिवाजी धुमाळ या विक्रेत्याने सांगितले की, महिनाभरापूर्वी मोठ्या आकाराच्या लिंबाला प्रतिक्विंटल ७,५०० रुपये दर मिळत होता. मात्र, सध्या घाऊक बाजारात त्याच आकाराच्या लिंबाला प्रतिक्विंटलला १० हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळत आहे. मागील महिनाभरात लिंबू दरात जवळपास दीडपट वाढ झाली आहे.
लिंबाचे दर प्रतिक्विंटल (रु.)जानेवारी - ३,०००फेब्रुवारी - ७,५०० मार्च - १०,०००