गत महिनाभरापासून उन्हाची प्रखरता वाढली असून, सध्या तापमान ४२ अंशांवर पोहोचत आहे. त्यामुळे पाणी पाणीतळी कमालीची खालावली असून, विहिरींनी तळ गाठला आहे. तर, बोअर कोरडे पडत आहेत. परिणामी, उन्हाळी पिकांसह भाजीपाला धोक्यात आला आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांवर आल्याने दर वधारले आहेत. प्रामुख्याने एका लिंबासाठी पाच ते आठ रुपये मोजावे लागत आहेत.
हिंगोली जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर गेल्याने सकाळी ९ वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे हिंगोलीकरांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तर, दुसरीकडे यंदा उन्हाच्या तडाख्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे ५० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत. काही भाज्या तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने खरेदी करताना घाम फुटत आहे.
तसेच गत महिनाभरापासून विहिरींनी तळ गाठला आहे तर बोअरही कोरडे पडले आहेत. अशा परिस्थितीत भाजीपाल्याला पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे भाजी मंडईत आवक कमी होत आहे. परिणामी, जवळपास सर्वच भाज्यांचे दर वधारले आहेत. जून अखेरपर्यंत भाव वधारलेले राहण्याची शक्यता असल्याचे शेतकरी संदीप नरवाडे यांनी सांगितले.
एक किलो लिंबू दीडशे ते दोनशे रुपये
लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांवर पोहोचला असून, आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. एका लिंबासाठी हिंगोलीकरांना पाच ते आठ रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारात लिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत तर किरकोळ बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे लिंबाच्या दराने ग्राहकांना घाम फुटत असल्याचे चित्र आहे.
लिंबूपाणी फायदेशीर
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो; मात्र उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
उन्हाळा संपेपर्यंत दर कायम हिवाळ्यात लिंबाचे दर नियंत्रणात होते; मात्र तापमानात जसजशी वाढ होत आहे, तसतशी लिंबांच्या भावातही वाढ होत आहे. शहरातील बाजारात लिंबाचे भाव वधारल्याचे दिसून आले. प्रतिकिलो लिबासाठी जवळपास १०० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे यंदा लिंबाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे पाहावयास मिळत आहे.
हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत