उन्हाळा सुरू झाला की, गृहिणींची वर्षभर लागणारे चिखट व इतर मसाले, इतर साहित्य बनविण्यासाठीची लगबग सुरू होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीचे दर जवळपास अर्ध्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, तिखट मिरची गोड झाल्याची भावना गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यासह इतर जिल्ह्यांतून आणि तेलंगणामधूनही मोठ्या प्रमाणात मिरची येथे विकण्यासाठी आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीचे दर कमी असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
दर कमी झाल्यामुळे गृहिणींचीही वर्षभराचे तिखट तयार करण्यासाठी लगबग सुरू असून, मिरची कुटून घेण्यासाठी चक्कीवर गर्दी बघायला मिळत आहे. विशेषतः चंद्रपूर येथील गोल बाजारमध्ये असलेल्या चक्कीवर मिरची कांडपसाठी रांग लागली आहे.
हे ही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
उन्हाळ्यामुळे धणे, हळद, तेजपत्त्याची तेजी सुरूच
मिरचीचे दर कमी झाले असले तरी इतर मसाल्यांच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये हळदीचा दर १४० ते २१० रुपये किलो होता. आता हळद घाऊक बाजारामध्ये १६० ते २२० रुपये किलोने विकली जात आहे. धणे ६० ते १४० वरून ९० ते १७० रुपये, दगडफूल २८० ते ४०० वरून ३०० ते ४५० रुपये, काळीमिरी ६०० ते ८५० वरून ६५० ते ९५० रुपये व तेजपत्ता ३९ ते ५५ वरून ४५ ते ९० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. परिणामी भाव उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतकऱ्यांकडील मिरची घेण्याला प्राधान्य देतात. अधिक तिखट असलेल्या मिरचीची मागणी आहे. - रमेश वाटेकर, शेतकरी, चंद्रपूर