Join us

Limbu Bajar Bhav : लिंबाच्या बाजारभावात मोठी वाढ; पण जादा दराचा फायदा नेमका कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:33 IST

मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. तापमानासोबतच भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गवारच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सांगली : मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. तापमानासोबतच भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गवारच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

देशी गवारीला प्रति किलो १०० ते १२० रुपये दर मिळत आहे. लिंबूचे दर गगनाला भिडले असून, पाच रुपयाला एक मिळत आहे. या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना कमी तर व्यापाऱ्यांनाच जास्त फायदा होत आहे.

उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे भाजीपाल्याची लागवड कमी होते. तसेच वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याचे नुकसान होते. परिणामी, उत्पादनात घट येते. दुसरीकडे ग्राहकांकडून भाजीपाल्याची मागणी मात्र कायम आहे.

मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजीपाल्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मजुरीही प्रचंड वाढली आहे.

लिंबूचे दर भिडले गगनालाउन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यानंतर नागरिक लिंबू सरबत पिण्यावर भर देतात. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढते. तसेच उन्हाळ्यात लिंबाची आवक कमी असते. त्यामुळे भावात वाढ होते. शहरात पाच ते सहा रुपयांना एक तर १९० रुपये किलो दराने लिंबाची विक्री होत आहे.

शेतकऱ्यांची निराशाभाजीपाल्याचे दर वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. शेतकऱ्यांकडून अल्प भावात भाजीपाला खरेदी करुन किरकोळ विक्रेते जास्त दरात ग्राहकांना विक्री करतात.

पालेभाज्यांचे दर स्थिरचांगल्या आरोग्यासाठी आहारात पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे अनेक नागरिक त्यांच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करतात. यामुळेच पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. तरीही पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. सध्या मेथी १५, पालक १० तर कोथिंबिरीचा दर १५ ते २० रुपये प्रति पेंढी आहे.

भाजीपाल्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी बियाणे, कीटकनाशके, खतांच्या दरात वाढ होत आहे; मात्र भाजीपाल्याचे दर कायम आहेत. शेतकऱ्यांकडून अल्प दरात खरेदी करण्यात येते. ग्राहकांना मात्र जास्त दरात विक्री करण्यात येते. - सोपान माने, भाजीपाला उत्पादक शेतकरी

अधिक वाचा: Mango Market : अक्षय तृतीयेपर्यंत कसे राहतील आंब्याचे दर; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकबाजारमार्केट यार्डतापमानभाज्या