Join us

खारीफाटा मार्केटमध्ये जनावरांचा आठवडे बाजार सुरू

By बिभिषण बागल | Published: August 06, 2023 2:00 AM

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी विविध जातींच्या गायी, म्हशी तसेच शेती तयार करण्यासाठी लागणाऱ्या बैलांचा बाजार सुरू करण्यात आला आहे.

खारीफाटा ता. देवळा येथील श्री रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांच्या आठवडे बाजाराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेतीपूरक व्यवसाय म्हणून तरुणांनी दुग्धोत्पादन व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे आवाहन साई गिरणा दूध संघाचे संस्थापक समाधान हिरे यांनी केले.

खारीफाटा येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये कांदा खरेदी-विक्री बरोबरच टमाटा, भाजीपाला आदी शेतमालाचा लिलाव होत असतो. परंतु उमराणेसह परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी विविध जातींच्या गायी, म्हशी तसेच शेती तयार करण्यासाठी लागणाऱ्या बैलांचा बाजार सुरू करण्यात आल्याची माहिती मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल व पुंडलिक देवरे यांनी दिली. या बाजाराचे उद्घाटन बारामती येथील सावंत डेअरीचे संस्थापक डॉ. रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.बी.आर. नरवडे, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिंदे, जि.प. कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, कृषी तंत्रज्ञान प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र निकम, पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू झांबरे, कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खंडुकाका देवरे, माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, पंचायत पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र नीळकंठ देवरे यांनी केले. तर पंकज ओस्तवाल यांनी आभार मानले. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी तरुणांना शासकीय योजना व दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले.

'यापूर्वी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी घेण्यासाठी लांब ठिकाणी जावे लागत होते. शिवाय फसवणुकीचा धोका होता. त्यामुळे येथील रामेश्वर मार्केटमध्ये जनावरांचा बाजार सुरु झाल्याने दुग्ध व्यवसायाकडे बेरोजगार तरुणांना वळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. - शिवा सुभाष देवरे, पशुपालक' 

टॅग्स :मार्केट यार्डबाजारगाय