जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात मागील खरीप हंगामात एकही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावल्याने विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठले होते. त्याचबरोबर पाझर तलाव, नदी, नाले कोरडेठाक पडले आहेत. परंतु, थोड्याफार प्रमाणात पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती.
मात्र, उन्हाळ्याचे दिवस असल्याने उत्पादन कमी झाल्यामुळे शुक्रवारच्या मंठा येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याच्या भावात तेजी असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
पावसाळा आणि हिवाळा ऋतूंमध्ये कांदा, अद्रक व लसणाची लागवड कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली होती. परंतु, बाजारात नवीन पीक आल्यानंतर काही प्रमाणात भावात घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यात खरिपातील हंगामात पाऊस न पडल्याने पावसाळा व हिवाळा ऋतूतही कांदा पिकांची अल्प प्रमाणात लागवड झाली होती.
त्यामुळे कांद्याच्या भावातही मोठी तेजी आली होती. आता लसूण, अद्रकाच्या भावात मोठी तेजी असल्याचे दिसत आहे. हे भाव आणखी दोन महिने कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
हिरवी मिरची | ८० रुपये | टोमॅटो | २० रुपये |
ओला कांदा | ३० रुपये | बटाटा | २५ रुपये |
वाळलेला कांदा | २० रुपये | गवार | ४० रुपये |
फूल कोबी | ४० रुपये | चवळी | ४० रुपये |
पत्ता कोबी | ४० रुपये | लसूण | १६० रुपये |
भेंडी | ४० रुपये | अद्रक | १६० रुपये |
मेथीची एक जुडी - १५ रुपये |
पालक एक जुडी - १० रुपये |
शेपू एक जुडी - १० रुपये |
यंदा पाझर तलाव पूर्णतः आटले असून, विहिरींनी तळ गाठले आहेत. त्यामुळे ऊस लागवडही कमी प्रमाणात झाली. तर उन्हाळ्यातील पिकेही शेतकऱ्यांना घेता आली नाहीत.
काही शेतकऱ्यांकडे पाण्याची थोडीफार व्यवस्था आहे, त्यांनी भाजीपाला लागवडीला पसंती दिली आहे. त्यामुळे भाजीपाला सध्या तेजीत आहे. तर दिवाळीनंतर लसणाची लागवड केली जाते. त्यामुळे या काळात ४०० रूपये किलो लसून होता. आता आठवडी बाजारात १५० रुपये किलो आहे.
भाजीपाल्याचे भाव आणखी वाढणार
मंठा येथील आठवडी बाजारात काही भाजीपाल्याचे दर वगळता सरासरी ३० ते ४० रुपये किलोप्रमाणे भाजीपाला विक्री झाल्याचे दिसून आले. हिरवी मिरची, लसूण आणि अदक देखील चांगला भाव खात आहे. दरम्यान, पुढील महिन्यापासून भाजीपाल्याच्या भावात आणखी तेजी येईल. ही तेजी पुढील तीन ते चार महिन्यांपर्यंत टिकून राहील. - अल्लाबकस, भाजीपाला व्यापारी
अवकाळीचा बसला फटका
खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने ५० टक्के रब्बीचा पेरा घटला होता. परंतु, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी केली होती. परंतु, ही पिके जोमात आल्यानंतर पुन्हा अवकाळी व गारपिटीने मोठे नुकसान केले. आता भाजीपालाही जोमात होता. परंतु, दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीने मोठा फटका बसला आहे. - हरिभाऊ खरात, शेतकरी