'व्हॅलेंटाईन डे'च्या आठवड्यातील 'रोज डे'. अर्थात जगभर साजरा केल्या जाणाऱ्या प्रेमाच्या आठवड्याचा पहिला दिवस. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असतं. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियकराला गुलाबाचं फूल देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतो. हा आठवडा सर्वच प्रेमविरांसाठी आनंदाचा, उत्साहाचा असतो. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतात गुलाबाचं फूल उमलतं त्या शेतकऱ्यांना या गुलाबाची किती किंमत मिळते आपल्याला माहितीये का?
महाराष्ट्रात उत्पादित होणारा गुलाब जपान, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, अरब, हॉलंड, ग्रीस, यूरोप आणि दुबईला पाठवले जातात. निर्यातक्षम गुलाब शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देत असतो. त्याचबरोबर व्हॅलेंटाईनच्या आठवड्यामध्ये गुलाबाला चांगली मागणी असते. यामुळे दरही वाढतात पण यंदा गुलाबाच्या दरात फारशी वाढ झाल्याचं दिसत नाही. दैनंदिन बाजारात जेवढा दर गुलाबाला मिळतो तेवढाच दर या काळात मिळत असल्याचं चित्र सध्या गुलाब बाजारात दिसून येत आहे.
सध्या एका फुलाला शेतकऱ्यांना १० ते १२ रूपये दर मिळत असून काही ठिकाणी केवळ ५ ते ६ रूपये दर मिळत आहे. साताऱ्यातील शेतकऱ्यांना एका किलोमागे ७० ते ८० रूपये दर मिळत असल्याची माहिती आहे. व्हॅलेंटाईन मुळे गुलाबाची निर्यात वाढली आहे पण दर 'जैसे थे'च आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईनमध्ये शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
व्हॅलेंटाईनचा व्यापाऱ्यांनाच फायदा जास्तशेतकऱ्यांकडून विकल्या जाणाऱ्या गुलाबाचे दर 'जैसे थे' आहेत. शेतकऱ्यांना एका फुलाला ५ ते १२ रूपयांच्या दरम्यान दर मिळतोय पण त्या तुलनेत ग्राहकांना विक्री होणाऱ्या गुलाबाच्या दरात वाढ होऊन एक फूल ४० ते ५० रूपयांना विक्री केले जात आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकचा आणि रोज डे चा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त फायदा होताना दिसत आहे.
मागच्या एका महिन्यामध्ये गुलाबाला मागणी चांगली आहे, १ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत सरासरी दर साडेसात रूपये होते. तर २१ ते २९ जानेवारी दरम्यान दर हे १०.५० ते ११ रूपये होते. ३० जानेवारीपासून लोकलचे दर १२ रूपये प्रतिफूल आणि एक्स्पोर्टचे दर १३.५० ते १४ रूपये प्रतिफूल एवढे होते. - पंडित शिकारे (प्रगतशील गुलाब उत्पादक शेतकरी, मावळ)
लाल रंगाच्या २० गुलाबाच्या फुलाच्या गड्डीला २०० ते २५० रूपये दर लोकल मार्केटमध्ये मिळत आहे तर एक्स्पोर्टमध्ये एका फुलाला १५ ते २० रूपयांचा दर मिळत आहे. जानेवारी महिन्यामध्ये आवक कमी असल्यामुळे रेट जास्त होते पण या आठवड्यामध्ये गुलाबाची आवक वाढली आहे. - बाळासाहेब शिंगोटे (प्रगतशील गुलाब उत्पादक शेतकरी, तळेगाव दाभाडे)
यंदाच्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या फुलाचे दर वाढले नाहीत. सध्या जो गुलाब व्हॅलेंटाईन साठी विक्री केला जात आहे तो गुलाब केवळ ७० ते ८० रूपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. तर ५ ते ६ रूपये नगाप्रमाणे विक्री होत आहेत. हे दर रेग्यूलर मार्केटमध्येसुद्धा मिळतात. त्यामुळे या प्रेमाच्या आठवड्यामध्ये गुलाबाच्या दरात वाढ झालेली नाही.- प्रकाश साबळे (गुलाब उत्पादक शेतकरी, शिवथर, जि. सातारा)
व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या फुलांचे दर वाढले नाहीत. पण या निमित्ताने एक्पोर्टमध्ये वाढ झाली आहे. निर्यात होणाऱ्या एका फुलाला २० ते २२ रूपये नगाप्रमाणे दर मिळत असून महाराष्ट्र किंवा भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर ५ ते ६ रूपये नगाप्रमाणे दर मिळत आहे.- धनंजय कदम (GM, Flower Council Of India)