Market yard close :
वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी कारंजा बाजार समितीमधील यार्ड २ मधील परिसर अधिग्रहित करण्यात आला आहे. त्यामुळे या यार्डवर २४ नोव्हेंबरपर्यंत अर्थात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद राहणार आहेत.
त्याशिवाय रिसोड बाजार समितीची इमारतही निवडणुकीच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आल्याने या बाजार समितीमधील शेतमाल खरेदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ मतदारसंघात आज (२० नोव्हेंबर) रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीची इमारत आणि परिसर अधिग्रहित करण्यात आला आहे. त्याशिवाय कारंजा या बाजार समितीमधील यार्ड क्रमांक २ चा परिसरही अधिग्रहित करण्यात आला असून, याच ठिकाणी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
याबाबतचे पत्र कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १९ ऑक्टोबरलाच बाजार समितीला दिले होते, तर रिसोड बाजार समिती प्रशासनालाही रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पत्र दिले आहे.
त्यामुळे या बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार आधीपासूनच बंद ठेवण्यात आले आहेत. तर, आता कारंजा बाजार समितीच्या यार्ड २ वरील शेतमाल खरेदीचे व्यवहारही १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार आहेत.
कारंजा बाजार समितीच्या यार्ड १ वर खरेदी सुरळीत !
कारंजा बाजार समितीच्या यार्ड क्रमांक २ चा परिसर निवडणुकीच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आला असला तरी या बाजार समितीमधील यार्ड क्रमांक १ वरील शेतमाल खरेदीचे व्यवहार मात्र सुरळीत राहणार आहेत, अशी माहिती या बाजार समितीचे सचिव नीलेश भाकरे यांनी दिली.
बुधवारी सर्व बाजार समित्या राहणार बंद
राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा मुख्य बाजार समित्यांसह अनसिंग, शिरपूर आणि शेलूबाजार या उपबाजारातील शेतमाल खरेदीचे व्यवहारही बंद राहणार आहेत.