अकोला : दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल असलेला कापूस दिवाळीनंतर आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अकोट बाजारपेठेत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये दर मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खुल्या बाजारातील सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुरूवातीला ७ हजार ८०० रूपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील का नाही याची शाश्वती देता येणार नाही.
सरकीचे दर उत्पादनही घटले
- खुल्या बाजारातील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून आहेत.
- गेल्या वर्षी ४ हजार २०० रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी ३ हजार ३०० ते ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.