पुणे : मागच्या जवळपास १० दिवसांपासून मांजरी उपबाजार समितीमध्ये खोतीदार आणि दुबार विक्री बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बाजार समितीतील खोतीदारांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असून बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, पुण्यातील मांजरी येथील स्व. अण्णासाहेब मगर उपबाजार हा शेतकरी ते थेट ग्राहक असा आहे पण येथे खोतीदार आणि दुबार विक्रेते घुसल्याने शेतकऱ्यांचा माल कमी दरात खरेदी केला जातो आणि पुढे त्याच जागेवर जास्त दराने विक्री केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून शेतकऱ्यांनी त्यांच्या विरूद्ध आवाज उठवला आहे.
या आधीही खोतीदार आणि दुबार विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली होती. पण त्यांनी या बाजार समितीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी बंद पुकारला होता. या बंदच्या आंदोलनाला काही शेतकऱ्यांनी तर काही राजकीय पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर मांजरी उपबाजार समितीच्या प्रशासनाने पुन्हा खोतीदार आणि दुबार विक्रेत्यांना प्रवेश दिला. त्यामुळे खोतीदार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचे खोतीदारांविरूद्धचे आंदोलन गेल्या १० दिवसांपासून सुरू असून संचालक सुदर्शन चौधरी हेसुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत. ते कायमच खोतीदार आणि दुबार विक्रेत्यांच्या विरोधात भूमिका घेत असतात. दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये अर्धनग्न होऊन आंदोलन केले होते तर आज त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून थेट बाजार समितीच्या आवारातच जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून आंदोलन केले आहे.