उन्हाळ्यात आमरस-पोळी खाणे सर्वानाच आवडते. अनेक ठिकाणी तर हातठेल्यावर आंबा रस विक्री उपलब्ध असतो. मार्च महिन्याला सुरुवात होताच बाजारपेठेतआंबा विक्रीस उपलब्ध झाला आहे. ग्राहकही आवडीने आंब्याची चव चाखत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे.
हजार रुपये डझन
सध्या बाजारात हापूस आंब्याचा डझनाचा दर ८५० ते हजार रुपये इतका आहे. रत्नागिरी हापूस आंब्याची चार डझनांच्या पेटीची किमत चार हजार रुपयांपर्यंत आहे. मार्च महिना संपल्यानंतर एप्रिलमध्ये आवक वाढून दर निम्म्यावर येतील.
वारा, अवकाळीमुळे मोठे नुकसान
काही दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आंब्याचा मोहोर अनेक ठिकाणी झडला, त्यामुळे काही भागांत आंब्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
भाव कमी कधी होणार?
सध्या हंगाम सुरू झाला आहे. आवक कमी आहे. त्यामुळे डझनाचा दर हजार रुपयांपर्यंत आहे. एप्रिलमध्ये आवक वाढेल. तर, कर्नाटक व इतर ठिकाणचा आंबा दाखल होईल. त्यानंतर दर कमी होतील.
कोकणातून आला हापूस आंबा
■ आपल्या भागात कोकणातून मोठ्या प्रमाणात आंबा येतो.
■ स्थानिक गावठी आंबा बाजारात येण्यास अवधी आहे.
■ कोकणातील आंब्यालाच सर्वाधिक मागणी असते.
सद्य:स्थितीत बाजारपेठेत हापूस आंबा व्रिकीस आला आहे. दर जास्त आहेत. त्यामुळे काही ठरावीक ग्राहकच आंब्याची खरेदी करत आहेत. साधारणतः पंधरवड्यात आंब्याची आवक वाढून दर कमी होतील असे चित्र आहे. - सागर मदने, फळ व्यापारी, सांगली