राज्यातील अनेक भागात जून महिन्यात आतापर्यंत बरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांचे नियोजन केले आहे. बरेच शेतकरी यंदाही मका पेरण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी मका पेरलाही आहे. सुमारे ७५ ते ८० दिवसांत म्हणजेच अडीच महिन्यांत काढणीवर येणाऱ्या मका पिकाला काय भाव मिळेल? याचीही उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.
मक्याचे देशातील उत्पादन
मका हे आंतराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतली जाते.
प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांचा समावेश होतो. भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किमतीवर परिणाम होत असतो.
मक्याचे जागतिक उत्पादन कसे असेल?
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, जगात मागील वर्षांच्या तुलनेत ६ टक्के मक्याचे उत्पादन वाढ होण्याच्या अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मका निर्यात २०२३-२४ मध्ये ३६ लाख टनांची वाढ होईल असा अंदाज आहे.
यंदाचा उत्पादन अंदाज काय आहे?
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार देशात सन २०२३-२४ मध्ये मक्याच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे. देशात चालू वर्षीच्या मे २०२४ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या मे २०२३ च्या तुलेनत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात खरीप २०२३-२४ मध्ये मक्याच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे.
भारत सरकार कृषी विभागाच्या माहितीनुसार (data for the year 2023- 24 is based on 2nd advance estimates), २०२३-२४ च्या खरीप हंगामात भारतात मक्याच्या लागवड ८२.०६ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार असल्याची संभवता वर्तविण्यात आली आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत १.८९% (२०२२-२३ चे खरीप क्षेत्र ८०.५३ लाख हेक्टर)अधिक आहे.
जुलै ते सप्टेंबर दरम्यान मक्याचे भाव असे असतील
मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे आहे.
जुलै ते सप्टेंबर २०२१: रुपये १७७४ प्रति क्विंटल
जुलै ते सप्टेंबर २०२२: रुपये २१५७ प्रति क्विंटल
जुलै ते सप्टेंबर २०२३: रुपये २०८२ प्रति क्विंटल
खरीप हंगाम २०२३-२४ साठी मका पिकाची आधारभूत किंमत (MSP) रु. २०९० प्रति क्वि. इतकी आहे. जुलै ते सप्टेंबर २०२४ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत अंदाज रुपये २१०० ते २६०० प्रति क्विंटल असा वर्तविण्यात आला आहे.
पुणे येथील स्मार्ट प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या विश्लेषकांनी हा अंदाज वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय किंमती, आर्थिक घटक, हवामान आणि सरकारी धोरण यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे या अंदाजात बदल होऊ शकतो असेही या कक्षाने म्हटले आहे.