अतुल जाधवदेवराष्टे : अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे.
त्यामुळे मका क्विंटलला तीन हजार २०० रुपये भाव गेला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना कमी; पण व्यापारी अधिक प्रमाण उचलत आहेत.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते; पण यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी तसेच मक्याला झालेला खोड आळीमुळे मका पिकाला मोठा फटका बसला आहे.
गतवर्षी मका पिकासाठी पाऊस योग्य प्रमाणात असल्यामुळे मकाचे पीक जोरदार आले होते. त्यामुळे मक्याला गतवर्षी प्रतिक्विंटल १९०० ते २२०० रुपये भाव मिळत होता; पण यावर्षी मार्च महिनापासून मक्याचे भाव वाढत गेले.
मार्च महिन्यामध्ये मक्याला सरासरी २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता; मात्र त्यानंतर मका भावामध्ये घट होण्याऐवजी मक्याला भाव वाढत गेला.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मक्याच्या दराने मागील सर्व रेकॉर्ड मोडत प्रतिक्विंटल तीन हजार २०० रुपये भाव मिळू लागला आहे; पण सध्या शेतकऱ्याजवळ मका कमी प्रमाणात आहे. व्यापाऱ्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणात मका असल्यामुळे याचा जादा फायदा व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे.