इंदापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार व उपबाजारात मक्याच्या ३५ हजार पिशव्यांची आवक झाली झाली आहे. प्रति क्विंटलला २ हजार २५१ रुपये दर मिळून ५ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
कांदा मार्केटमध्ये कांद्याची प्रति क्विंटल सहा हजार रुपये या उच्चांकी दराने विक्री झाली आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांनी दिली.
ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन डाळिंब किमान २० ते १५१ रुपये, पेरू १० ते २५ रुपये व सीताफळाची १० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री झालेली आहे.
इंदापूरचे मासे मार्केट व भिगवण येथील दैनंदिन मार्केटमध्ये माशांची उच्चांकी दरात विक्री होत आहे. आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा वगैरे राज्यातून माशांना मागणी आहे. मार्केटमध्ये खरेदीदार खरेदी चांगल्या दरात करत आहेत.
भुसार, डाळिंब, कांदा, मासे, पेरू व सीताफळ या शेतीमालास मुख्य बाजार इंदापूर, उपबाजार भिगवण भुसार व जनावरे, शेळी- मेंढी रविवारचा बाजार व दैनंदिन मासे, शेतमालास, उपबाजार निमगांव-केतकी बुधवार-शनिवार व शनिवारचा शेळी-मेंढी बाजार, उपबाजार वालचंदनगर मंगळवार-शुक्रवार तर उपबाजार बावडा भुसार शेतमालास शुक्रवार करीता बाजारपेठा प्रसिद्ध आहेत. इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशेबपट्टी, त्वरित रक्कम अदा केली जाते. शेतमाल विक्रीस अनुषंगिक सुविधा व अद्ययावत मार्केट उभारणी यामुळे शेतकऱ्यांना सेवा सुविधा देणेस ही बाजार समिती अग्रेसर आहे. - तुषार जाधव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर