उन्हाचा कडाका वाढल्यापासून मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी असली तरी तुलनेने आवक कमी आहे. मात्र आता कर्नाटकची लाल मिरची कमी दरात विक्रीसाठी आली आहे.
शहरातील अनेक चौकात, प्रमुख रस्त्यांवर शेतकरी आपल्या शेतातील माल विक्रीसाठी घेऊन दाखल झाले आहेत. त्यामुळे महिलांना बाजार न गाठता दारातच आणि बाजारभावापेक्षा कमी दरात मिरची घेता येत असल्याने महिलावर्गात समाधान दिसते आहे. मात्र याचा फटका दलालांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन दिवसात ३ टन लाल मिरचीची विक्री
पनवेल परिसरात नवीन पनवेल या ठिकाणी लवंगी आणि संकेश्वरी मिरची दाखल होताच महिलावर्गाची खरेदीसाठी गर्दी वाढली. सद्यस्थितीत या मिरचीचा बाजारभाव २५० ते २८० रुपये किलो आहे. पटेल या शेतकऱ्याने २०० रुपये किलोने विक्री केली आहे. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता आल्याने चांगलाच नफा झाला झाल्याचे पटेल यांनी सांगितले.
उन्हाळा सुरू होताच मिरचीला मागणी
• उन्हाळ्यात अनेक घरांतून मसाला बनवला जातो. काहीजण घरगुती चापरासाठी, तर काहीजण छोट्यामोठ्या मसाल्याच्या व्यवसायासाठीही मिरची खरेदी करतात. त्यामुळे मिरचीला मोठी मागणी असते. सध्या ग्राहकांच्या दारात कर्नाटकची मिरची विक्रीस आली आहे.
• कर्नाटक-बिजापूरमधील जमखडी येथील शेतकरी खादर पटेल यांची चार एकर जिरायती शेती आहे. त्यात आले. कांदे आणि संकेश्वरी, लवंगी मिरचीचं ते उत्पादन घेतात. शेतातील निघणाऱ्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादनात तोटा सहन करावा लागतो.
• मिरचीचे उत्पादन बाजारात व्यापाऱ्यांना न विकता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावे असे पटेल यांनी ठरवले. काढणी झाल्यानंतर विक्रीसाठी पनवेल गाठले. कमी दरात महिलांना लाल मिरची मिळत असल्याने मिरची खरेदीसाठी गर्दी वाढलीय.
लवंगी तसेच संकेश्वरी लाल मिरचीला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचे गणित जुळवून दोन एकरमध्ये लाल मिरची लागवड केली आहे. बाजारात न जाता थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे चांगलाच नफा मिळाला आहे. - खादर पटेल, शेतकरी