मिरचीचा हंगाम संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ५० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे.
एप्रिल अखेरपर्यंत मिरचीचा हंगाम सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये नागरिक मिरची खरेदी करून त्याची चटणी तयार करतात. वर्षभर पुरेल एवढा मिरचीचा साठा करून ठेवला जातो. तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
गतवर्षी मिरची व मिरची पावडरचेही दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही मिरचीचा ठसका बसला होता. यावर्षीच्या हंगामामध्ये दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारच्या मिरचीचे दर नियंत्रणात येत आहेत.
यामुळे ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले आहे. मार्च व एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची ग्राहकांकडून मागणी वाढणार असून यावर्षी पीक चांगले असल्यामुळे भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाव नियंत्रणातयावर्षी मिरचीचे दर नियंत्रणात आहेत. हंगाम सुरू झाला असून आवक अशीच वाढत राहिली तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
एका व्यक्तीने रोज किती तिखट खावे?- चटणी हा सर्वाच्या आहारातील अविभाज्य भाग झाला आहे.- रोज किती चटणी खावी याविषयी प्रत्येकाच्या चवीप्रमाणे वेगवेगळे मत आहे.- काहींना तिखट भाजी लागते, तर काहींना आळणी, डॉक्टरांच्या मते अति तिखट खावू नये, तिखटामुळे पचनाशी संबंधित अजार वाढण्याची शक्यता असते.- यामुळे तिखट कमी प्रमाणात खावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
कोठून येते मिरची?मुंबईबाजार समितीमध्ये आंध्र प्रदेशमधील गुंटूर व तेलंगणातील वारंगळ व खमात येथून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. इतर ठिकाणांवरूनही मिरचीची आवक होत असते.
यावर्षीचा मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे दर कमी झाले असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. - अमरीश बरोत, व्यापारी मसाला मार्केट