बाजारात विविध प्रकारचे मसाले उपलब्ध असले, तरी घरोघरी वर्षभर पुरणारे तिखट तयार केले जाते. त्यासाठी लागणारी लाल मिरची मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. परजिल्ह्यातील शेतकरी थेट टेम्पोतून मिरच्या विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील आठवडा बाजारातमिरची विक्रेते दाखल होत आहेत.
सुरुवातीला मिरचीचे दर ६०० रुपये किलो होते. मात्र, सध्या दर उतरल्याने, गृहिणी मिरची खरेदीसाठी लगबग करत आहेत. संकेश्वरी, ब्याडगी, गुंटूर प्रकारची मिरची उपलब्ध असून, २५० रुपयांपासून दर सांगण्यात येत आहेत. मिरचीचा दर कमी झाल्याचा फायदा घेत, घरोघरी मसाले तयार करण्याची गृहिणींची लगबग सुरू झाली आहे.
मसाले खरेदी
घरगुती तिखट तयार करत असताना त्यामध्ये धने, बडीशेप, जिरे, गरम मसाल्यांमध्ये वेलची, काळीमिरी, दगडफूल, लवंग, जायपत्री, तेजपत्ता याचा वापर केला जातो. त्यामुळे मिरच्यांसह मसाल्यासाठी लागणारे अन्य जिन्नसही खरेदी केले जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत दर बन्यापैकी आवाक्यात आहेत.
बाजारात विविध प्रकारचे तयार मसाले उपलब्ध असले तरी ते परवडत नाहीत. सणासुदीला किंवा एखाद्यावेळी स्वादासाठी मसाला वापरणे शक्य आहे. अन्यथा घरगुती तिखटच परवडते. गतवर्षी मिरच्यांचे दर सर्वाधिक होतेः परंतु यावर्षी तुलनेने दरात घसरण झाली आहे. तिखट, कमी तिखट प्रकारची मिरची उपलब्ध आहे. - आशा मोरे
घरगुती तिखट तयार करणे, हा सुद्धा वर्षातील एक महत्त्वाचा कार्यक्रमच म्हणावा लागेल. मिरच्या खरेदी करणे, वाळविणे, दळून आणणे यात तीन-चार दिवस सहज मोडतात. तयार तिखट बाजारात उपलब्ध असले तरी ते परवडत नाही. त्यामुळे मिरच्या आणून तिखट करणे योग्य ठरते, यावर्षी दर कमी आहेत. - जयश्री पारकर