गतवर्षी उन्हाळ्यात आंब्यांना फारसा मोहर आला नव्हता. तसेच वातावरणातही बदल होऊन त्याचा कैऱ्यांवर परिणाम झाला. दुसरीकडे अनेक झाडांना कैऱ्या लागल्याही नव्हत्या. त्यामुळे तर बाजारपेठांमध्ये आंबे क्वचित दिसून येत होते. परंतु, यंदा आंबा उत्पादनासाठी पोषक व आवश्यक वातावरण निर्माण झाले आहे. चांगल्या वातावरणामुळे झाडांवर भरपूर प्रमाणात कैऱ्या दिसून येत आहेत. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनात वाढ होऊन त्याची गोडी लोकांना चाखायला मिळणार आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी देशी व विदेशी आंब्याची लागवड केली आहे. अनेक शेतकरी आंब्यांना बाजार मिळवून देत आहेत. काही जण व्यापाऱ्यांना आंबे विक्री करून पैसा उभा करून देतात. तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, कौठा, सोमठाणा, दाभडी, पार्टी (बु), पार्डी (खुर्द), कानोसा आदी भागात गावरान, देशी, विदेशी आब्यांच्या बागा पाहायला मिळतात. यंदा फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात वादळी वारे व हलकासा पाऊस झाला. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कैऱ्यांचे नुकसान झाले.
एकंदरीत आंब्यांना वातावरण आजतरी चांगले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी हवामानतज्ज्ञांनी वादळवारा, गारपीट, पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, वादळवारे व पाऊस तालुक्यात झाला नाही. त्यामुळे आंब्याचा मोहर टिकला आहे. सध्या झाडांना कैन्या लगडल्या असून, पोषक वातावरणामुळे गावठी, देशी, विदेशी आंब्यांना चांगले दिवस आले आहेत.हे ही वाचा ! चार मित्रांनी उभारला नैसर्गिक उत्पादनाचा ब्रॅंड
कैर्या बाजारात दाखल
दोन दिवसांपासून वसमत व परिसरातील आठवडी बाजारात कैर्या दाखल झाल्या आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कैर्यांचा भावही वाढला आहे. ५ रुपयाला एक याप्रमाणे कैरी विक्री होऊ लागल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. भावामध्ये घासाघीस केली तर १० रुपयांच्या तीन कैर्या विक्रेते देऊ लागल्याचेही नागरिक सांगत आहेत. तालुक्यात अवकाळी पाऊस झाला नाही. त्यामुळे कैर्यांचे नुकसान झाले नसल्याने आम्हाला कैर्या विक्रीसाठी मिळत आहेत. यामुळे थोडाबहुत नफाही आम्हाला मिळत आहे. - नजीर शेख, विक्रेता