आंब्याला केवळ भारतातच नाही, तर परदेशातूनही मोठी मागणी आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. यावर्षी गेल्या तीन महिन्यात २०५७.२७८ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे. यातील सर्वाधिक म्हणजेच निम्मी निर्यात इंग्लंडमध्ये (१०८६.७५६८ मेट्रिक टन) झाली आहे.
यावर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करीत बागायतदारांनी कीडरोगांवर नियंत्रण मिळविले. त्यासाठी महागड्या कीटकनाशकांचाही वापर केला. पहिल्या टप्प्यातील आंबा कमीच होता. मात्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबाबाजारात येण्यास सुरुवात झाली. दि. १ मार्चपासून आंब्याची परदेशी निर्यात झाली.
परदेशातील आंब्याची मागणी कायम असल्यामुळे मुंबई, तसेच स्थानिक बाजारातील दरात फारशी घसरण झाली नाही. वाशीतूनच परदेशी निर्यात सुरू होती. यंदा परदेशातून आंब्याला वाढती मागणी होती. हवाईमार्गे वाहतुकीचे दर अधिक आहेत.
समुद्रमार्गे वाहतुकीचे दर कमी असले तरी समुद्रचाच्यांच्या उपद्रवामुळे समुद्री वाहतूक बंद झाली. त्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला. मागणी वाढती असल्याने अखेरच्या टप्प्यात आंबा निर्यात हवाईमार्गे झाली. यामध्ये कोकणच्या हापूससह अन्य राज्यांतील आंब्याचाही समावेश आहे.
निर्यात अजून सुरुच
- यावर्षी आंबा उत्पादनासाठी संकटाचा सामना करावा लागला, त्यातून वाचलेला आंबा बागायतदारांनी बाजारपेठेत पाठविण्यास प्रारंभ केला.
- त्यातूनच निवडक आंबा परदेशात पाठविण्यात आला. वाशी येथील पणन विभागातर्फे आंब्यावर प्रक्रिया करून विक्रीसाठी पाठविण्यात आला.
- हापूस आंबा हंगाम संपला असला तरी अन्य राज्यांतून आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असून, अद्याप तरी परदेशातून आंब्याची निर्यात सुरू आहे.
वाशी येथे प्रक्रिया
परदेशी आंबा पाठविताना त्या त्या देशातील नियमांचे पालन काटेकोरपणे करावेच लागते. उष्ण जल, बाष्पजल प्रक्रिया करूनच आंबा निर्यात करण्यात येतो. त्यानुसार वाशी येथील प्रक्रिया केंद्रात निर्यात होणाऱ्या आंब्यावर प्रक्रिया करण्यात आली.
देशनिहाय आंबा निर्यात
देश - निर्यात (मेट्रिक टन)
अमेरिका - ६९३.९६
ऑस्ट्रेलिया - २३.८८१८
मलेशिया - ०.५८८८
इंग्लंड - १०८६.७५६८
युरोपियन संघ - १०१.६८०६
जपान - ३७.९४६
न्यूझीलंड - १०६.८२५
दक्षिण कोरिया - ३,८८४
युरोपियन देश - १.७५४
अधिक वाचा: Mango Rejuvenation जुन्या आंबा बागेचं उत्पादन कसं वाढवाल, असे करा व्यवस्थापन