सोलापूर : कोकणासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने सोलापूरच्या बाजारपेठेत हापूससह अन्य प्रजातीच्या आंब्यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत.
रत्नागिरी हापूसला सध्या ५०० ते १००० रुपये डझन दर मिळतोय, तर कर्नाटकी हापूस २०० ते ६०० रुपयांमध्ये विकला जात आहे. कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे.
फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे. बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील हापूस, बदामी, लालबाग, मलेका आंबा विक्रीला उपलब्ध आहे.
७० ते १० रुपये किलो तो विकला जातो. सध्या बाजारपेठेत रत्नागिरी हापूस ५०० रुपये डझन दराने विकला जात असून, कर्नाटकी हापूस २०० ते ४०० रुपये डझन दराने मिळतोय.
याशिवाय, बदाम आंबा ७० ते १०० रुपये किलो आणि लालबाग आंबा १०० ते १२० रुपये किलो दराने विक्रीस आहे. येत्या काही दिवसांत दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे नुकसान होत असल्याने याचाही बाजारावर परिणाम होणार आहे.
असे आहेत दर
रत्नागिरी हापूस : ५००-१००० प्रतिडझन
कर्नाटकी हापूस : २०० - ६००
अलिबाग हापूस : ४०० - ५००
बदाम : ७०-१०० प्रतिकिलो
लालबाग : १००-१२०
मलिका : १००
केसर : १२०-१६०
मोठ्या प्रमाणावर खरेदी
यंदा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी हंगाम साधारणपणे ३० जूनपर्यंत सुरू असतो. यंदा हापूसचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, दर कमी झाल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. दरात आणखी घसरण झाली, तर हंगामाच्या शेवटी ग्राहकांची चव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
आंबा लवकर तयार होतोय
उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारातील आंब्यांची आवक वाढली आहे. आवक कायम राहिल्यास दर अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे. २० एप्रिलनंतर आवक वाढणार परिणामी ३० एप्रिल रोजी होणाऱ्या अक्षय तृतीयेला आंबा आणखी स्वस्त होईल असे असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
अधिक वाचा: दुष्काळी जत भागात या शेतकऱ्याने केशर आंबा पिकातून केली क्रांती; वाचा सविस्तर