नामदेव मोरे
नवी मुंबई : फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. मुंबईबाजार समितीमध्ये रोज १५०० ते १८०० टन आंब्याची आवक होत आहे.
याशिवाय थेट शेतकरी ते ग्राहक योजनेंतर्गतही मोठ्या प्रमाणात आंबा मुंबई, नवी मुंबईत दाखल होत आहे. सर्व माध्यमातून यावर्षीही ५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून, जुलैअखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होणार आहेत.
मुंबई ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सर्वात जास्त आंबा याच शहरात विकला जातो. गतवर्षी संपूर्ण जगामध्ये ४१६ कोटी रुपयांचा आंबा विकला होता.
संपूर्ण जगभर जेवढी निर्यात होते, त्यापेक्षा जास्त विक्री फक्त मुंबईमध्ये होत असते. यावर्षी आंबा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी १ एप्रिलपासून आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतून रोज ६५ ते ७० हजार पेट्या व दक्षिणेकडील राज्यातून २५ ते ३० हजार पेट्यांची आवक होत आहे.
संपूर्ण देशातून सरासरी ९० हजार ते १ लाख पेट्यांची आवक सुरू आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहण्याची शक्यता आहे.
अंदाजे १ लाख टन आंब्याची विक्री यंदाच्या संपूर्ण हंगामात होण्याची शक्यता आहे. त्यातही अक्षयतृतीयेपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहण्याची शक्यता आहे.
सद्यः स्थितीमध्ये उपलब्ध आंबा व त्याचे दर
आंबा - होलसेल - किरकोळ
हापूस (डझन) - २०० ते ७०० - ५०० ते १५००
पायरी (डझन) - २०० ते ६०० - ४०० ते १०००
बदामी (किलो) - ४० ते १०० - ८० ते १५०
लालबाग (किलो) - ५० ते ७० - ८० ते १००
केसर (किलो) - १०० ते १६० - १५० ते २००
असे उपलब्ध होणार विविध प्रकारचे आंबे
कोकण (हापूस) : अक्षय तृतीयेपर्यंत सर्वाधिक आवक, मे व जूनमध्ये आवक कमी.
गुजरात : मेच्च्या सुरुवातीपासून हापूस, केसर, राजापुरी, पायरी.
पुणे : मेअखेरपासून जुन्नर हापूसची आवक सुरू होणार.
उत्तर प्रदेश : मेअखेरपासून जुलैअखेरपर्यंत लंगडा, दशेरी, चौसाची आवक.
या राज्यांतून आवक सुरू
सद्य:स्थितीमध्ये कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. पुढील काळात पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश व इतर राज्यांमधूनही आंब्याची आवक होणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे देशाच्या विविध भागांतून आंबे विक्रीसाठी येतात. फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होतील. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट
अधिक वाचा: दर वाढीच्या अपेक्षेने लाखोंचा खर्च करून तयार होतायत कांदा चाळी; शेतकऱ्यांची साठवणुकीलाच पसंती