वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला असून, बहुतांश शेतकरी वाशी (नवी मुंबई) येथे विक्रीला पाठवित आहेत; मात्र गेल्या चार दिवसांत वाशी मार्केटमधील आंब्याचे दर कोसळल्याने स्थानिक बाजारपेठेत आंब्याची विक्री होऊ लागली आहे.
रत्नागिरी बाजारात कच्चा व पिकलेला आंबा विक्रीसाठी उपलब्ध असून, एक हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. शहरातील छोट्या व स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे. बारीक फळ ८०० रुपये तर मोठे फळ हजार रुपये डझन दराने विकण्यात येत आहे.
पिकलेला आंबा मात्र १२०० ते १३०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. सध्या रमजान सुरू असल्याने आंब्याला मागणी वाढली आहे. रत्नागिरी हापूस प्रमाणे कर्नाटकातील केशर आंबाही विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. १२० रुपये किलो दराने या आंब्याची विक्री सुरू आहे.
खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, जिल्ह्यात विक्री व्यवस्था पुरेशी व सक्षम नसल्यामुळे येथील बागायतदारांना वाशी (नवी मुंबई) मार्केटवर अवलंबून रहावे लागते; मात्र वाशी मार्केटमध्येही सध्या आवक वाढल्याने दर गडगडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही बागायतदारांनी स्थानिक बाजारपेठेचा आधार घेतला आहे.
सध्याचा आंब्याचा दर (रुपये डझनामध्ये)
बारीक फळ ८००
मोठे फळ १०००
पिकलेला आंबा १२००-१३००
कर्नाटकातील केशर आंबा १२० रुपये किलो
काही बागायतदार स्वतः स्टॉल लावत आहेत. शहरासह, गणपतीपुळे, पावस, कोल्हापूर मार्गावर स्टॉल लावून आंब्याची विक्री केली जात आहे. पर्यटक येता जाता आंबा खरेदीसाठी थांबत आहेत. लाकडी पेटीसह एक, दोन डझनाच्या पुडुचाच्या खोक्यातून विक्री केली जात आहे. शिमगोत्सव सुरु झाला असल्याने मुंबईकर तसेच पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत. त्यामुळे आंब्याचा खप वाढेल असे सांगण्यात येत आहे.