देवगड हापूस आंब्याचे वाशी मार्केटमधील भाव घसरले असून ५ डझनी आंबा पेटीला २ ते अडीच हजार रुपये भाव आहे, तर बागायतदार पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली व स्थानिक बाजारपेठांमध्येही आठशे ते बाराशे रुपये प्रतिडझन आंब्याची विक्री करीत आहेत.
वाशी मार्केटमध्येच आंब्याला दलालवर्गाकडूनच कमी भाव मिळत आहे. वाशी मार्केटमधील दलालांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आंबा बागायतदारांनी एकत्र येणेही गरजेचे आहे. देवगड हापूस आंब्याचे उत्पादन यावर्षी उत्कृष्ट नसले तरी समाधानकारक आहे.
सध्या वाशी मार्केटमध्ये सुमारे ९० ते १०० ट्रक देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे, तर इतर राज्यांतून मिळून वाशी मार्केटला ७० ते ७५ हजार पेट्या दाखल होत आहेत. मार्च महिन्यामध्ये कमी भाव मिळण्याची गेल्या काही वर्षांमधील इतिहास पाहता सर्वांत कमी भाव मिळणारे यावर्षीचा मार्च महिना आहे.
देवगड हापूस आंबा पेटीला चांगला भाव मिळत असतानाच दलालवर्गाकडून आंबा बागायतदारांची होणारी पिळवणूक व दलालांची मक्तेदारी संपुष्टात येत नसल्यामुळेच बागायतदारांवर अन्याय होत आहे. यावर्षी ५० हजार मेट्रिक टन देवगड हापूस असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहराला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. त्याच्यानंतर डिसेंबरअखेरीस थोड्याफार प्रमाणात मोहर आला होता. नंतर जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मोहर आला होता. परंतु, या मोहरावर थ्रीप्सने थैमान घातले होते. त्यामुळे यावर्षीच्या उत्पादनावर लगाम लागला आहे.
सध्या देवगड तालुक्यामधून वाशी मार्केटला १०० हून अधिक मोठ्या गाड्या रवाना झाल्या, तर खासगीरीत्याही बहुतांश आंबा बागायतदार आंबा विक्री पुणे, कोल्हापूर, मुंबई, सातारा, सांगली अन्य ठिकाणी विक्री करीत आहेत.
खासगीरीत्या आंबा बागायतदार आंबे पिकवून प्रतिडझनला आठशे ते बाराशे रुपये भाव मिळवीत आहेत, तर वाशी मार्केटमधील ५ डझन पेटीला दोन ते अडीच हजार रुपये भाव मिळत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली तफावत ही सरळ सरळ बागायतदारांची दलालवर्गाकडून लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा वाशी मार्केट २०२० साली फळ विक्रीसाठी बंद झाले होते. त्यावेळी देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी आत्मनिर्भय बनून स्वतःच्या मालाची स्वतः जाहिरात करून पुणे, कोल्हापूर, मुंबई, सातारा, सांगली व महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये आंब्याची विक्री करून चांगला भाव मिळविला होता. यानंतर गेली ४ वर्षे अशाच पद्धतीने आंबा बागायतदार आपल्या मालाची विक्री करून चांगला भाव डझनाला मिळवीत आहेत.
देवगड तालुक्यामध्ये किंवा नादगावमध्ये मार्केटयार्ड व्हावे अशी मागणी बागायतदारांमधून होत आहे. ही मागणी शासनाने मान्य केली तर भविष्यात वाशी मार्केटमध्ये एकही पेटी जाणार नाही. याच ठिकाणी येथीलच बागायतदारांनी स्वतःच्या मालाची स्वतः विक्री केल्यास वाशी मार्केटमधील दलालवर्गाकडून बागायतदारांची सुटका होऊ शकते.
देवगड स्थानिक बाजारपेठांमध्येही विविध ठिकाणी व गावागावांमध्ये बागेमध्ये स्टॉल उभारून येथील स्थानिक व्यापारीदेखील आंबा विक्री करीत आहेत. यालादेखील चांगला भाव आंबा बागायतदारांना मिळत आहे.
पुणे येथे गेल्या काही वर्षांपासून पणन मंडळाच्या महोत्सवामध्ये स्टॉल घेऊन देवगडमधील अनेक बागायतदार १ एप्रिल ते ३० मे पर्यंत आंब्याची विक्री करतात. या ठिकाणी बागायतदारांना चांगला भाव मिळतोच आणि पुणेकरांनाही देवगडचा अस्सल आंबा चाखायला मिळतो.
अयोध्याप्रसाद गावकरदेवगड