Marigold Cultivation:
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व परिसरात जून महिन्यात लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून, येथील फुलांना मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, सोलापूर आदी जिल्ह्यांतील मार्केटमध्ये १०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत आहे.
सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे. परिणामी, झेंडूचेदेखील भाव चांगले वाढले आहेत. फूल उत्पादक शेतकरी खासगी वाहनाने मार्केटमध्ये फुलांची विक्री करीत आहे. यंदा वालसावंगी परिसरातील शेतकऱ्यांचा झेंडू लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील मिरची लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने दरवर्षी २५ ते ३० हजार हेक्टर मिरची लागवड केली जाते. परंतु, मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व तोडणीचा खर्च वाढल्याने अनेकांनी मिरची उपटून टाकली आहे. मिरची लागवडीवर केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसते. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील एका शेतकऱ्याने अशाप्रकारे झेंडूच्या फुलांची शेती फुलवली आहे.
शेतकऱ्यांकडून झेंडू लागवडीला प्राधान्यशेतकऱ्यांनी मिरची लागवडीला फाटा देत झेंडू लागवडीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. सध्या मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांचे भाव तेजीत असल्याने शहरामध्ये झेंडू फुलांना अधिक भाव मिळताना दिसतोय. सध्या शहरामध्ये झेंडू मोठ्या प्रमाणात भाव खात असल्याने झेंडूच्या फुलांना मिरची लागवडीपेक्षा तिपटीने भाव वाढून मिळत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने अनेक राज्यांतील भाविक दर्शनासाठी महाराष्ट्रात येतात. त्यामुळे पावसाळयात जे शेतकरी झेंडू लागवड करतात, ते लाखो रुपयांची कमाई करतात. त्यामुळे अनेक शेतकरी इतर पिके घेण्याऐवजी झेंडूकडे वळताना दिसत आहेत. दसरा, नवरात्र, दिवाळी आदी सणात झेंडू फुलांच्या भावात आणखी वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
फुलांच्या भावात तेजी
सध्या नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये फुलांची आवक कमी असल्याने ५० रुपये किलोपासून ते ७० रुपयांपर्यंत कायम भाव मिळत आहे. परंतु, आणखी आवक घटल्यास फुलांच्या भावात तेजी कायम राहणार आहे. हे तीन महिन्यांत येणारे नगदी पीक असल्याने आठवड्याला तोडणीसाठी येणारा खर्चाही कमी आणि अधिक उत्पन्न देणारे पीक आहे.- प्रवीण कोथलकर, झेंडू उत्पादक शेतकरी, वालसावंगी