संजय लव्हाडे
जालना : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात चांगला उत्साह आहे. मात्र, ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, मूग, सर्व प्रकारचे खाद्यतेल, साखर, साबुदाणा मंदीत तर सोन्या-चांदीच्या भावाने अचानक उच्चांक गाठला आहे. कापड, रेडिमेड कपडे, होजीअरी, कटलरी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ग्राहकी चांगली मागणी आहे. मागच्या वर्षी सोयाबीनने शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग केला.
संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन भाववाढीची प्रतीक्षा केली, परंतु शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दरवाढ काही मिळाली नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता यावर्षीदेखील सोयाबीन हंगाम सुरू झाला असून नवीन सोयाबीन आता बाजारपेठेत येऊ लागले आहे. परंतु जर बाजारातील दरांचा विचार केला तर सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावापेक्षाही हे दर कमी मिळताना दिसून येत आहेत. सध्या बाजारामध्ये जे काही नवीन सोयाबीन विक्रीला येत आहे, त्याला ३ ते ४ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. हे बाजारभाव हमीभावापेक्षा देखील कमी आहेत.
त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीत सोयाबीनच्या दरात वाढ होईल की नाही? हा मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपुढे आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थिती बघितली तर यावर्षीदेखील सोयाबीनचे बाजारभाव अपेक्षित प्रमाणात वाढतील, अशी चिन्हे नाहीत. येत्या चार महिन्यांत सोयाबीनची आवक बाजारामध्ये वाढेल व त्याचादेखील दरावर दबाव दिसून येईल. त्यामुळे खुल्या बाजारातील हमीभावाचा टप्पा पार करतील याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येत आहे.
हरभरा भाव नरमले
हरभऱ्याच्या भावातही काहिशी नरमाई आली आहे. देशातील अनेक बाजारांत हरभऱ्याचा भाव वाढला होता. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली, पण सरकारच्या दबावामुळे आणि स्वस्त वाटाण्यामुळे हरभरा भावावर काहीसा दबाव आला आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ४३०० हजार ते ७००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दुसरीकडे हरभऱ्याला सणांमुळे मागणी आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोन्याच्या दरात तेजी
• गेल्या दोन दिवसांतच सोने १० ग्रॅममागे दोन हजार रुपयांनी वाढले. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. सोने ७८ हजार रुपये प्रती तोळा तर चांदीचे दर ९८ हजार रुपये प्रती किलो याप्रमाणे होते.
• सोन्याचे भाव दररोज नव-नवीन उच्चांक गाठत आहेत. आता दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई सुरू होत आहे. यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात होईल आणि सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सोन्याचा दर ८५ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.