अशोक मोरे
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार संत्रा उत्पादित केला आहे. मात्र, संत्र्याला पुणे, वाशी बाजारात समाधानकारक भावच मिळत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी आता संत्रा केरळ राज्यात पोहोचविला आहे. तेथे प्रतिकिलो पाच ते दहा रुपये वाढीव भाव मिळत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून या भागातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी संत्रा शेतीकडे वळला आहे. येथे अगदी नागपूरच्या तोडीचा संत्रा पिकविला जातो. त्यामुळे पाथर्डीचे संत्र्याचे आगार अशी या भागाची ओळख निर्माण झाली.
कोरोना महामारीच्या काळात व त्या अगोदर करंजी/मिरी परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी संत्र्याचे भाव कमी कमीच होत चालले आहेत.
त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी व व्यापारी चिंतेत आहेत. राज्यात संत्र्याच्या पुणे, वाशी (मुंबई) या दोनच ठिकाणी बाजारपेठा असल्याने तेथील व्यापारी व आडते शेतकऱ्यांची अडवणूक करून कमी भावात संत्रा खरेदी करीत होते, परंतु या वर्षी या भागातील व्यापाऱ्यांनी केरळसह इतर राज्यात संत्रा पाठविण्याचा निर्णय घेतला.
केरळ राज्यातील कोल्लम, चित्तूर या दोन शहरांमध्ये करंजी परिसरातून संत्रा पाठविला जात आहे. संत्रा उत्पादक शेतकरी अर्जुन ढोबळे, संजय तरटे, राम चौधरी, विठ्ठल जगताप, सतीश गाढवे, आदिनाथ लोखंडे, उद्धव लोखंडे, रघुनाथ झिंजे आदींसह इतर शेतकरी केरळला संत्रा पाठवित आहेत. याबाबत त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले.
किलोमागे दहा रुपये..
केरळ राज्यात संत्रा पाठविल्यास अधिक भाव मिळत आहे. तेथे पाठविण्याचा खर्च वजा जाता किलोमागे किमान पाच ते दहा रुपयांचा भावामागे फरक पडत आहे. त्यामुळे आता केरळलाच संत्रा पाठविण्यास प्राधान्य देत आहेत.
अनेक दिवसांपासून आम्ही शेतकऱ्यांचा संत्रा विकत घेत आहोत. मात्र, पुणे आणि वाशी (मुंबई) मार्केटला आडते व व्यापारी अडवणूक करतात. संत्रा कमी दराने खरेदी करतात. त्यामुळे आम्ही या भागातील संत्रा आता केरळात पाठविण्याचा निर्णय घेतला. - अंबादास टेमकर, संत्रा व्यापारी