Market Committee : यवतमाळ : शेतमालाची खरेदी करणाऱ्या बाजार समित्या २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत बंद राहणार आहेत. सहा दिवस शेतमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सोमवारी बाजार समित्यांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होती. अनेकांच्या शेतमालाचे रात्री उशिरापर्यंत मोजमाप सुरू होते.
खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करण्यासह शेतमजुरांची मजुरी चुकती करण्यासाठी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले आहे.
याच सुमारास दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले आहे. यातून खुल्या बाजारात सोयाबीन विक्रीसाठी एकच गर्दी झाली. सोमवारी यवतमाळच्या बाजारात सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार ५०० रुपये क्विंटलचे दर होते. तर ओलावा अधिक असणाऱ्या सोयाबीनला ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे दर नगण्य आहे. मात्र, कर्जाची परतफेड करणे आवश्यक असल्याने आणि पुढील कामकाजाला गती देण्यासाठी शेतकऱ्यांनी काही सोयाबीन सोमवारी विकले. सोमवारी शेतमाल खरेदी-विक्री करण्याचा अखेरचा दिवस होता.
पुढील सहा दिवस बाजारपेठ बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय आणि खासगी बाजार समितीमध्ये एकच गर्दी केली होती. यावेळी काटे करण्यासाठी विलंब झाल्याने रात्री उशिरापर्यंत काटे सुरू होते.
२९ ऑक्टोबरपासून दिवाळीमुळे बाजारपेठ बंद आहेत. यात शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस सुटी असल्याने शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार सहा दिवस बंद राहणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पुन्हा सुरू होणार आहे.
बाजार समितीमध्ये शासकीय कामकाज १ ते ३ पर्यंत बंद राहणार आहे. दिवाळीकरीता हमाल मंडळी सुटीवर असतात. व्यापाऱ्यांना हिशेब जुळवायचा असतो. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार व्यापाऱ्यांमुळे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. - रवी ढोक, सभापती, यवतमाळ बजार समिती
दिवाळीमुळे बाजारपेठ सोमवारी हाऊसफुल्ल होती. याठिकाणी साडेसात हजार क्विंटलची आवक राहिली. मात्र, सर्व शेतमालाचे काटे सुरूच आहेत. २९ ऑक्टोबर पासून ते ४ नोव्हेंबर पर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे. बाजार समितीमध्ये आलेला संपूर्ण शेतमाल मोजण्यात आला. - विजय मुंधडा, संचालक, चिंतामणी बाजार समिती