Join us

Dry Fodder मंगळवेढ्याच्या कडब्याने जनावरांच्या बाजारात खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:00 AM

मंगळवेढ्याच्या कसदार कडब्याने सांगोला येथील जनावरांच्या बाजारात चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे १८०० ते २६०० रुपये दराने कडब्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली.

अरुण लिगाडेसांगोला : मंगळवेढ्याच्या कसदार कडब्याने सांगोला येथील जनावरांच्या बाजारात चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे १८०० ते २६०० रुपये दराने कडब्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली.

शेतकऱ्यांनी कडबा खरेदी करून जनावरे जगविण्यासाठी सुक्या चाऱ्याची सोय केली. त्यामुळे महाग असो की स्वस्त, कसदार ज्वारीचा कडबा दुभत्या जनावरांना पोषक, खाण्यास चवदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मंगळवेढा तालुका जसं ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध आहे, तशाच प्रकारे ज्वारीच्या कडब्यालाही प्रसिद्धच आहे. उन्हाळा सुरू झाला की, मंगळवेढा तालुक्यातील शिवारातून व्यापारी, शेतकरी ट्रक, टेम्पोत कडबा भरून शेजारील तालुक्यांतील आठवडा बाजार, गावोगावी विक्रीसाठी घेऊन जात आहेत.

दरम्यान, रविवारी सांगोला येथील जनावरांच्या बाजारात मंगळवेढा येथून सुमारे १०० ट्रक, टेम्पो कडबा विक्रीस आणला होता. यावेळी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडबा खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

सुमारे १८०० ते २६०० रुपये दराने शेकडा (१००) कडबा विक्रीचा दर होता. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याअभावी शेतात जनावरांना ओला चारा नाही, आता पावसाळ्यात ओला चारा उपलब्ध होईपर्यंत शेतकरी कडबा खरेदी करून जनावरांच्या चाऱ्याची सोय करीत आहेत.

कडब्यातही पाहायला मिळाले वेगवेगळे प्रकार- बाजारात कडबा खरेदीदार व्यापाऱ्यांबरोबर शेतकरीही कडबा विक्रीसाठी घेऊन आल्याने बाजारात कडब्याचाच बोलबाला पाहावयास मिळाला.- ज्वारीच्या कडब्यातही वेगवेगळ्या कडबा पेंडीचे प्रकार पाहावयास मिळाले.- कापलेला कडबा पेंडी, बुडक्यांची कडबा पेंडी, काळी डागी कडबा पेंडी अशा लहान-मोठ्या पेंडीचा कडबा विक्रीसाठी आणला होता.सुमारे १८०० ते २६०० रुपये शेकडा दराने कडब्याची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा: Animal Ear Tagging जनावरांसाठी इअर टॅगिंगचा शेवटचा आठवडा.. उपचारही होणार बंद

टॅग्स :शेतकरीशेतीदुग्धव्यवसायदूधपाऊसबाजारमार्केट यार्ड