Join us

Market Rates : मागच्या हंगामातील सोयाबीन, कापूस, तुरीची आवक घटली! किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 7:54 PM

Market Rates : काही शेतकऱ्यांनी तर मागील दोन वर्षापासूनचा कापूस दर मिळण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला आहे. पण या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. 

मागच्या खरिप हंगामात म्हणजेच २०२३ मध्ये पेरलेल्या सोयाबीन, तूर आणि कापसाला पूर्ण हंगामात समाधानकारक दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची साठवणूक करून ठेवली आहे. काही शेतकऱ्यांनी तर मागील दोन वर्षापासूनचा कापूस दर मिळण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला आहे. पण या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. 

सध्या बाजारातील स्थितीचा विचार केला तर तूर, कापूस आणि सोयाबीनची आवक कमी झाली आहे. मात्र दरामध्ये कोणताच बदल झालेला दिसत नाही. तुरीचे दर हे १० हजार रूपये क्विंटलच्या आसपास स्थिर आहेत. तर कारंजा, लातूर, अकोला, अमरावती, हिंगणघाट, मलकापूर, मंगळूरपीर अशा बाजार समित्या वगळल्या तर इतर बाजार समित्यांमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी तुरीची आवक होताना दिसत आहे. तर ९ हजार ते १० हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर आहेत. 

सोयाबीनचीही राज्यातील आवक कमी झाली असून लासलगाव, माजलगाव, कारंजा, रिसोड, मानोरा, अमरावती, हिंगोली, लातूर, जालना, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट अशा प्रमुख बाजार समित्या वगळल्या तर इतर बाजारांत १०० क्विंटलपेक्षा कमी सोयाबीनची आवक होत आहे. तर मागच्या काही महिन्यांपासून ३ हजार ६०० ते ४ हजार २०० रूपयांच्या दरम्यान दर स्थिर असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, कापसाचा विचार केला तर यावल, पारशिवनी आमि धामणगाव-रेल्वे या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे ४८, १६० आणि २०० क्विंटल कापसाची मागील सात दिवसांत आवक झाली आहे. त्याशिवाय इतर बाजार समित्यांतील मागील हंगामातील कापसाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. तर ६ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल ते ७ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर कापसाला मिळताना दिसत आहे. 

टॅग्स :बाजारमार्केट यार्डसोयाबीनकापूसशेतकरी