Join us

पिवळे सोने असलेल्या हळदीची आवक वाढली; दरवाढीची झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 9:20 AM

एक ते दीड कि.मी. पर्यंत विक्रीसाठी वाहनांची रांग

हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केट यार्ड आठवडाभराच्या बंदनंतर सोमवारपासून सुरू झाले. या दिवशी जवळपास साडेतीनशे वाहनांतून पंधरा हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आली. आवक वाढल्याने भाव पडतो की काय? अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, भाववाढीची झळाळी कायम असल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या आठवड्यात चलनी नोटांची टंचाई निर्माण झाल्याने हळद विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना देण्याकरिता व्यापाऱ्यांकडे पैसे नव्हते. व्यवहार सुरळीत होईपर्यंत मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २२ एप्रिलपासून मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते. जवळपास सात दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

शेतकऱ्यांनी लवकर बीट, मोजमाप व्हावे, यासाठी आदल्या दिवशी रविवारीच मार्केट यार्ड जवळ केले. हिंगोलीसह परभणी, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड, वर्धा भागातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली. त्यामुळे तब्बल १५ हजार क्विंटल हळदीची विक्रमी आवक झाली. जवळपास ३५० वाहने हळद घेऊन दाखल झाल्याने एवढ्या वाहनांना मार्केट यार्ड आवारातही जागा अपुरी पडली. त्यामुळे रेल्वेस्टेशन रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अवकाळीमुळे उडतेय तारांबळ...

■ अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत असल्याने हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

■ पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी वाहनांवर मेनकापड, ताडपत्री झाकून आणत आहेत.

■ परंतु, वादळी वाऱ्यात वाहनाला बांधलेले कापड जागेवर राहत नसल्यामुळे हळद भिजण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पावसापासून हळद वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.

मोजमापासाठी लागणार तीन दिवस

मार्केट यार्डात हळदीची विक्रमी आवक झाल्याने मोजमापासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या ठिकाणचे मनुष्यबळ, काट्यांची संख्या लक्षात घेता एका दिवसात पाच हजार क्विंटल हळदीचे मोजमाप होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एक दिवस तर काहींना दोन दिवसांचा मुक्काम ठोकावा लागणार आहे.

१४ ते १७ हजार रुपये मिळाला भाव

■ यंदा उतारा घटला असतानाही सोयाबीनला कवडीमोल दर मिळाला. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हळदीने तारले. सोमवारी १४ ते १७ हजार रुपयांदरम्यान हळदीला भाव मिळाला.

■ मार्केट यार्डात आवक वाढल्यामुळे भाव समाधानकारक मिळेल की नाही, याची शाश्वती नव्हती. परंतु, चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत होते.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :पीकशेतीशेतकरीबाजारहिंगोली