Market : हिंगोली येथील बाजार समिती प्रशासनाने दीपावलीनिमित्त २८ ऑक्टोबरपासून मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. ४ नोव्हेंबरपासून व्यवहार सुरळीत झाले असून, सोयाबीन व हळदीची खरेदी- विक्री करण्यात आली.
सात दिवसानंतर शेतमालाचा लिलाव होणार असल्याने भावात वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, भाव पडतेच असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.
दीपावलीचा सण सर्वांना आनंदाने साजरा करता यावा, यासाठी बाजार समिती प्रशासनाने २८ ऑक्टोबरपासून मोंढ्यातील भुसार शेतमाल तसेच संत नामदेव मार्केट यार्डातील हळदीचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार सात दिवस शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद राहिला. दिवाळीचा सण साजरा झाल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून व्यवहार सुरू झाले आहेत.
सोयाबीनची आवक जवळपास ५५० क्विंटल झाली होती. ३ हजार ८०० ते ४ हजार ३०० रुपयांदरम्यान दर मिळाला तर ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. ११ हजार ५०० ते १३ हजार ५०० रुपये दराने हळदीची विक्री झाली.
दरम्यान, सात दिवसानंतर मोंढा सुरू होणार असल्याने सोयाबीनचे दर वधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दर कायम असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती.
सोयाबीन साडेचार हजारांचा पल्लाही गाठेना !
■ वाढता लागवड खर्च आणि उत्पादनात झालेली घट पाहता, सोयाबीनला किमान सहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. परंतु, सोयाबीन साडेचार हजारांचा पल्लाही गाठत नसल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
■ मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे भाव कायम पडते असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
■ सोयाबीनला व हळदीला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक पडून आहेत.
हळद उत्पादकांनाही फटका
यंदा एप्रिल, मे मध्ये हळदीला सरासरी १५ ते १६ हजारांचा भाव मिळाला होता. परंतु, जून लागताच दरात घसरण झाली. सध्या १२ ते १३ हजार रुपये भाव मिळत असल्याने हळद उत्पादकही अडचणीत सापडले आहेत. भाववाढीच्या आशेने विक्रीविना ठेवलेली हळद वधारत नसल्याने पडत्या दरात विक्री करण्याची वेळ येत आहे.