Join us

Market Update : शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा; हळदीची दरकोंडी कायम; भुईमूग किती रूपयांनी गडगडला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 4:01 PM

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे महिन्यांत विक्रमी भावात विक्री झालेल्या हळदीच्या भावात घसरण होत गेली. ही दरकोंडी गेल्या अडीच ते तीन महिन्यांनंतरही कायम आहे. (Market Update)

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे महिन्यांत विक्रमी भावात विक्री झालेल्या हळदीच्या भावात घसरण होत गेली. ही दरकोंडी गेल्या अडीच ते तीन महिन्यांनंतरही कायम असून, सध्या सरासरी १२ हजार ९०० रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. तर भुईमूगही मागील आठवड्यांच्या तुलनेत जवळपास तीनशे ते साडेतीनशेंनी घसरला आहे.

हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात यंदा हंगामात हळदीची विक्रमी आवक झाली आणि भावही उच्चांकी मिळाला. एप्रिल, मे दरम्यान सरासरी १६ ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलने हळद विक्री झाली तर दररोज आवकही चार ते पाच हजार क्विंटलची होत होती. मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी याठिकाणी हळद विक्री केली.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र हळदीच्या दरात घसरण होत गेली, ती अजूनही कायम आहे. सध्या किमान ११ हजार ८०० ते जास्तीत जास्त १४ हजारांचा भाव मिळत आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत जवळपास क्विंटलमागे दोन ते तीन हजारांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशीच परिस्थिती भुईमुगाचीही असून, हंगामात साडेसहा हजार रुपये क्विंटलने विक्री झालेला भुईमूग आता जास्तीत जास्त सहा हजाराने विक्री होत आहे. तर सरासरी ५ हजार ७५० रुपये भाव मिळत आहे

पंधरा दिवसांत येणार नवे सोयाबीन...

यंदा खरिपाची पेरणी मृगात आटोपली. त्यामुळे काही भागात सोयाबीन काढणीस आले आहे. हे सोयाबीन पंधरवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर काही भागात आठवडा ते पंधरवड्यात काढणीला येईल, या सोयाबीनला जवळपास महिन्याचा कालावधी लागू शकतो. नवीन सोयाबीनला तरी समाधानकारक भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

भुईमुगाची आवक मंदावली...

आठवड्यापासून मोंढ्यात भुईमुगाची आवक मंदावली असून, सध्या सरासरी १५० ते २०० क्विंटलची आवक होत आहे. मे, जूनमध्ये शेतकऱ्यांनी भुईमूग विक्री केला. त्यामुळे आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे भुईमूग शिल्लक आहे. ते आता भाववाढीची प्रतीक्षा न करता विक्रीसाठी आणत आहेत. आगामी दिवसांत आवक आणखी मंदावण्याची शक्यता आहे.

मोंढ्यात आलेला शेतमाल (आवक क्चिं. मध्ये)

शेतमाल        आवक (क्विं. मध्ये)    बाजार भाव (क्विं. मध्ये)
भुईमूग  १९९                   ५,७५०
सोयाबीन १६०                     ४,३००
हळद ६००                    १२,८००
तूर  ११०                      १०,३००
मूग   १५                        -

सोयाबीनच्या भावात किंचित वाढ...

उत्पादनात घट होऊनही सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून येत आहे. गेल्या वर्षी ऐन काढणीवेळी अवकाळी पावसाचा मारा झाल्याने सोयाबीन भिजले. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली. अशा परिस्थितीत किमान सहा हजारांचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सोयाबीनने पाच हजारांचा पल्लाही गाठला नाही. सरासरी ४ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले सोयाबीन ऑगस्टमध्ये घसरले होते. परंतु, आता क्विंटलमागे जवळपास दोनशे ते तीनशेंची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डसोयाबीन