संजय लव्हाडे / जालना :
नवरात्रीनिमित्त बाजारात ग्राहकी चांगली असून, साखरेसह खाद्यतेल आणि सोने चांदीच्या दरात तेजी आली आहे. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढणार असल्याचे संकेत आहेत.
तूर आणि हरभऱ्याची साठा मर्यादा आता संपुष्टात आली आहे. सरकारने तूर आणि हरभऱ्यावर लागू केलेल्या साठा मर्यादेची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. सरकारने जुलै २०२४मध्ये तूर आणि हरभऱ्यावर ३० सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा लागू केली होती.
त्यानंतर मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारने अद्याप कोणताच आदेश काढलेला नाही. त्यामुळे तूर आणि हरभऱ्याची स्टॉक लिमिट आता संपुष्टात आली आहे. पुढच्या काही आठवड्यांपासून नव्या तुरीची बाजारात आवक सुरू होईल. नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर स्टॉक लिमिट काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सरकारने यंदा तुरीला ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला, तर सध्या बाजारात तुरीला १० हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सरकारने स्टॉक लिमिट काढले तरी तुरीच्या भावात फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
कारण एकतर सरकारचे बाजारावर बारीक लक्ष आहे आणि नवा माल पुढच्या काळात बाजारात दाखल होईल. यामुळेच सरकारने तुरीवरील स्टॉकलिमिट काढल्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यामुळे आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात तेजी आली.
जालना बाजारपेठेत पामतेल १३ हजार ८००, सूर्यफूल तेल १३ हजार ९००, सरकी तेल १३ हजार १००, सोयाबीन तेल १३ हजार ६०० आणि करडी तेलाचे दर २१ हजार रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
सोन्याचे दर ८० हजार पार होण्याची शक्यता
गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्याचे भाव स्थिर होते. पण, आता अचानक सोन्याच्या भावात वाढ होणे सुरू झाले आहे. सोन्याचे भाव ८० हजारांच्या वर जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे लोक आता सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
जर सोन्याची मागणी वाढली, तर मग त्याचे भाव ८० हजाराच्या पार जाऊ शकतात. सध्या काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या इराण इस्रायल यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. जालना बाजारपेठेत सोन्याचे दर ७६ हजार ५०० रुपये प्रतितोळा आणि चांदीचे दर ९२ हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत.