संजय लव्हाडे
जालना : बाजारपेठेत गूळभेंडीचा नवीन हुरडा बाजारात दाखल झाला असून, खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. बाजरी, मका, सोयाबीन आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात तेजी आली असून, सोने-चांदीच्या दरात मंदी आली आहे.
हुरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. ज्वारीची कोवळी लुसलुशीत दिसणारी दाणेदार कणसं, हातावर कणीस मळल्यानंतर त्या कणसातून पडणारे हिरवेगार दाणे आणि हुरडा पार्त्या यासाठी खवय्ये सज्ज झाले आहेत. हुरड्याचे दर ३०० ते ४०० रुपये प्रति किलो असे आहेत.
हमीभाव जाहीर झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात किंचित तेजी आली. आता ग्रीन गोल्ड (९३०५) हे सोयाबीन बियाणे बाजारात आले असून, त्याचे दर ४६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल आणि ३३५ हे बियाणे देखील बाजारात उपलब्ध आहे. भाव ४३०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
साधारण सोयाबीनचे दर ३३०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ६००० पोती इतकी आहे. जालना बाजारपेठेत ज्वारीची आवक १५०० पोती इतकी असून, भाव २००० ते ३६५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
यासोबत बाजरीचे दर दोनशे रुपयांनी वाढले असून, आवक १०० पोती इतकी आहे. बाजरीचे भाव २००० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक ३२०० पोते इतकी असून, भाव १६७५ ते २२५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. बाजारपेठेत साखरेचे दर ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
सोने ७७ हजारांवर
दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. शनिवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात होणारी घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. जालना बाजारपेठेत सोन्याचे दर ७७००० रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर ९०००० रुपये प्रतिकिलो असे आहेत.
कापसाला साडेसात हजारांचा दर
खरिपाचा कापूस बाजारात दाखल झाला आहे. सीसीआय व खासगी बाजारात कापसाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. खासगी बाजारात सरासरी ७ हजार २८७, तर सीसीआयकडून ७ हजार ४७१ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सीसीआयकडे वाढता कल दिसून येत आहे. जालना बाजारपेठेत कापसाची आवक ५०० ते ७०० क्विंटल आहे.