Market Yard :
हिंगोली : विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्या अनुषंगाने बाजार समितीचा मोंढा, हळद मार्केट यार्ड १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान बंद ठेवण्यात आले होते.
२१ नोव्हेंबर रोजी शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. या दिवशी सोयाबीन व हळदीची आवक सरासरी दीड हजार क्विंटलची झाली होती. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. याकरिता शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
येथील बाजार समिती कार्यालयातही मतदान केंद्र होते. त्यामुळे मोंढा व हळद मार्केट यार्डात शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे शक्य होणार नसल्याने बाजार समिती प्रशासनाने
१८ ते २० नोव्हेंबरदरम्यान व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी शेतमाल खरेदी-विक्री पूर्ववत सुरू झाली.
सोयाबीन, हळदीची आवक वाढली
तीन दिवसांच्या बंदनंतर मोंढा, हळद मार्केट यार्ड सुरू झाल्याने गुरुवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीन, हळदीची आवक जवळपास दीड हजार क्विंटल झाली होती.
सोयाबीनला ३ हजार ८७५ ते ४ हजार ४४५ तर हळदीला ११ हजार ५०० ते १४ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.
हळद पाचशे रुपयांनी वधारली
एप्रिल, मे महिन्याच्या तुलनेत हळदीच्या दरात क्विंटलमागे दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशा व्यक्त होत असताना गुरुवारी (२१ नोव्हेंबर) रोजी हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात हळदीच्या दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांची वाढ झाली. १२ हजार ते १४ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. भावात वाढ झाल्याने हळद उत्पादकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
खुल्या बाजारात विक्री करावा लागला शेतमाल
मोंढा, हळद मार्केट यार्ड तीन दिवस बंद राहिल्याने पैशाची निकड असलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतमाल विक्री करावा लागला. याचा फायदा मात्र खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी घेत शेतमालाचे भाव पाडले. यात शेतकऱ्यांना फटका बसला. आता मोंढा, हळद मार्केट यार्ड सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.