Market Yard Conference : आज कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ आणि पणन मंडळाने आयोजित केलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिषदेला गालबोट लागले आहे. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून न घेता केवळ १० मिनिटांत कार्यक्रमातून काढता पाय घेतल्यामुळे गोंधळ झाला. त्यानंतर बाजार समित्यांच्या संतापलेल्या प्रतिनिधींनी पोस्टर फाडून पणनमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे.
"पणनमंत्री म्हणून राज्याला एक भ्रष्ट मंत्री लाभला आहे. अब्दुल सत्तार यांनी राज्यभरातील बाजार समित्यांची वाट लावली आहे. ज्या मंत्र्यापुढे बाजार समित्यांच्या अडचणी मांडण्यासाठी ८०० ते १००० किलोमीटरचा प्रवास करून राज्यभरातील बाजार समित्यांचे प्रतिनिधी आले त्या कार्यक्रमासाठी पणनमंत्री या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसेल तर काय फायदा?" अशा संतप्त प्रतिक्रिया बाजार समित्यांच्या सभापतींनी दिल्या आहेत. यावेळी घोषणा देणाऱ्यांमध्ये चंद्रपूर, अमरावती, लातूर, जळगाव, धुळे बाजार समित्यांचे सभापती उपस्थित होते.
दरम्यान, राज्यभरातील बाजार समित्यांच्या वेगवेगळ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्यभरातील सर्वच सहकारी बाजार समित्यांची परिषद आयोजित केली होती. पण पणन मंत्र्यांनीच बाजार समित्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर काही प्रतिनिधींनी अब्दुल सत्तार यांच्या फोटोवर जोडे मारले आणि पोस्टरही फाडण्यात आले.
कॅबिनेटची शेवटची बैठक आज राज्य सरकारने बोलावली असून या बैठकीला उशीर होत असल्याचं कारण यावेळी पणन मंत्र्यांनी दिले. पण राज्यभरातील सर्व बाजार समित्यांचे सचिव, सभापती, संचालक यांना पणन मंत्र्यांसोबत अडचणींवर चर्चा करण्यासाठी बोलावले होते त्याच कार्यक्रमात पणन मंत्र्यांनी वेळ न देता काढता पाय घेणे ही खेदजनक बाब असल्याचा आरोप उपस्थितांकडून करण्यात आलाय. थेट पणनमंत्र्यांनीच बाजार समित्यांच्या प्रश्नांना अर्धचंद्र दाखवत वाऱ्यावर सोडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील बाजार समित्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांना समजले पाहिजेत यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री यांच्याकडे बाजार समित्यांची परिषद आयोजन करण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यभरातील बाजार समित्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले, पण पणनमंत्री या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून न घेता भर सभेतून उठून गेले, त्यामुळे मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार आहोत.
- प्रविणकुमार नाहाटा (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य)