Join us

Market Yard Conference : बाजार समित्यांत होणार सुधारणा! राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 2:39 PM

Market Yard Conference : बदलत्या काळानुरूप बाजार समित्यांच्या कामकाजामध्ये करावयाचे बदल, सोयी-सुविधा, अडचणी आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune : मागील ४० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून राज्यातील ३०५ बाजार समित्या व त्यांचे ६२३ उप बाजार यांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसीत करण्याचे कामकाज सुरु आहे. पण बदलत्या काळानुरूप बाजार समित्यांच्या कामकाजामध्ये करावयाचे बदल, सोयी-सुविधा, अडचणी आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  

कृषि पणन मंडळाकडून कृषी पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबविणे, योजना राबविणे, नवीन कार्यक्रम आखणे तसेच शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांच्या विकासासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

राज्यात कृषि मालाच्या निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करुन त्यांचेमार्फत निर्यातवृध्दी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तर कृषी पणन व्यवस्थेत अद्ययावतपणाबरोबरच सुसूत्रता आणि समन्वयता आणण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय नियोजनाचे कामकाजही करण्यात येत आहे.

राज्यातील बाजार समित्यांचे कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना यावर संवाद साधण्यासाठी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. 

ही राज्यस्तरीय परिषद ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, छत्रपती संभाजी महाराज चोक, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड