दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या मुहुर्तावर बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक होत असते. सध्या दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडूला मोठी मागणी असल्याने आवक वाढली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा थेट शेतकऱ्यांकडून शहरातील विविध ठिकाणी बसून झेंडूची किरकोळ विक्री केली जात आहे. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूला कमी भाव मिळताना दिसत आहे.
पुणे बाजार समितीत मागच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली. आज (ता. २३) सकाळच्या सत्रात जवळपास पावणे दोनशे टन झेंडू बाजारात आला असून किमान २००० ते कमाल ४००० रूपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. सरासरी ३००० रूपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. उद्या दसरा असल्यामुळे दुपारच्या सत्रात जास्त आवक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दसरा आणि दिवाळीच्या काळात झेंडूला मोठी मागणी असल्यामुळे चांगला दर मिळत असतो पण यंदा शेतकऱ्यांच्या हातात केवळ २० ते ४० रूपये किलोप्रमाणे पैसे येत आहेत. तर ग्राहकांना १०० ते १५० रूपये किलो याप्रमाणे झेंडू विकत घ्यावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्येही आज मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली असून ४०० ते ५०० वाहनांंनी गर्दी गोदाकाठी झाली होती. गोदाकाठी भरलेल्या किरकोळ फूल बाजारात शेतकऱ्यांकडून १५० रूपये जाळी (क्रेट) प्रमाणे विक्री केली जात होती. एका जाळीमध्ये साधारण चार किलो फुले बसतात. तर त्यानुसार शेतकऱ्यांना केवळ ३७ ते ३८ रूपये किलो याप्रमाणे दर मिळाला आहे.
शेतकरी बराच माल थेट शेतातून किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत असतात. त्यामुळे आमच्या बाजार समितीत कमी माल येतो. या ठिकाणी सध्या १००० ते १ हजार २०० रूपये प्रतीक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळत आहे.
- संतोष पोटे, प्रभारी. खानगाव (लासलगाव) बाजार समिती
झेंडूचे आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
23/10/2023 | ||||||
पुणे | लोकल | क्विंटल | 1762 | 2000 | 4000 | 3000 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 20 | 3000 | 4000 | 3500 |
कामठी | लोकल | क्विंटल | 12 | 1500 | 2500 | 2000 |