Market Yard :
अकोला : शेतकऱ्यांकडून दरवाढ झाली तरीसुद्धा व्यापाऱ्यांकडून दरवाढ दिली जात नसल्याचा आरोप करीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज बंद करण्यात आले आहे.
हमाल कामगार संघटनेने मंगळवार (३ डिसेंबर) पासून बंद पुकारला आहे. त्यामुळे अकोला बाजार समितीत कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले असून, यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक आज (४ डिसेंबर) रोजी होणार आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज १४ ते १५ कोटींची उलाढाल होते. हमाल कामगारांच्या दरवाढीच्या प्रश्नाने ही बाजार समिती पुन्हा नव्याने चर्चेत आली आहे.
मंगळवारपासून हमाल व कामगार संघटनेने काम बंद केले असल्याने शेतकऱ्यांकडून बाजार समितीत आणलेल्या मालाचा लिलावदेखील होऊ शकला नाही. दिवसभर बाजार समितीत शुकशुकाट होता.
व्यापारी संघटनेची आज बैठक ग्रीन मर्चेंट असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेची बैठक हमाल कामगारांच्या बंदसंदर्भात होणार आहे. या बैठकीत काय तोडगा निघेल, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. यावर कोणता तोडगा निघेल याकडे हमाल कामगारांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांकडून दरवाढ झाली, व्यापाऱ्यांकडून दरवाढ का नाही, असा प्रश्न करीत हमाल कामगार असोसिएशनने काम बंद करीत दरवाढ करण्याची मागणी रेटून धरली आहे.
सध्या शेतमाल आणू नये
हमाल कामगार असोसिएशने काम बंद केल्यामुळे अकोला बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल खरेदी -विक्री करता सध्या घेऊ येऊ नये. तसेच ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याने शेतमालाचे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील सुचना मिळेपर्यंत बाजारात न येण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांनी केले आहे.