Join us

मेथी जुडी पाच रुपयांवर, उत्पादन खर्चही सुटेना!  

By गोकुळ पवार | Published: December 11, 2023 12:42 PM

मेथीच्या भाजीच्या दरात घसरण झाली असून प्रती जुडी पाच रुपयांवर दर आला आहे.

अत्यल्प झालेल्या पावसामुळे खरीपा पाठोपाठ रब्बीच्या आशाही धुसर झाल्या असताना जेमतेम पाण्यावर केलेल्या भाजीपाल्यालाही मातीमोल भाव मिळत आहे. वारंवार आर्थिक तोटा सहन होत नसलेले शेतकरी चिंतातुर झाले आहे. मेथीच्या भाजीच्या दरात ही घसरण झाली असून प्रती जुडी पाच रुपयांवर दर आला आहे. यामुळे उत्पादन खर्चही मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्यांने एक एकर मेथीच्या भाजीत जनावरे सोडून संताप व्यक्त केला. 

गेल्या काही दिवसांपासून अनेक पिकांच्या दरात कमालीची घसरण झाली असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आता रोजच्या आहारात समावेश असलेल्या मेथीची भाजीही कवडीमोल भावात विक्री केली जात आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील शेतकरी शंकर गायकवाड यांनी शासकीय निधीतून शेतात केलेल्या शेततळ्याच्या पाण्यावर मेथीच्या भाजीचे पीक घेतले. मात्र गेल्या काही दिवसापासून बाजारात सर्वच भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशा परस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चतर सोडाच सध्याच्या बाजारभावात वाहतूक खर्चही हातात येत नाही. त्यामुळे आधीच दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला सुरवातीलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला तर पुढील सहा महिने शेतकऱ्यांनी कसे जगायचे अशी चिंता सध्या शेतकरी कुटूंबाला सतावत आहे. 

एक एकर मेथीच्या भाजीची लागवड केली होती. यासाठी 130 रुपये किलो दराचे 55 किलो बियाणे लागले. पंधराशे रूपये प्रमाणे तीन हजाराची फवारणी केली.एक गोणी खताचा 1800 रूपयाची मात्रा दिली. मेहनत सोडून एकराला जवळपास 12 हजार रूपये खर्च झाला. मात्र भाजीला दीड ते दोन रूपये दर मिळत असल्यामुळे वाहतूक खर्चही हातात पडत नसल्याने भाजीच्या शेतात जनावरे सोडल्याची प्रतिक्रिया शेतकरी शंकर गायकवाड यांनी दिली. सध्या बाजारात सर्वच भाजीपाल्याच्या दरात घट आली आहे. त्यामुळे अत्यल्प पाण्यावर पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही हातात पडत नसल्याचे चित्र आहे. 

मेथी भाजीचे आजचे बाजारभाव 

दरम्यान मेथी भाजीचे राज्यातील आजचे बाजार भाव पाहिले असता श्रीरामपूर बाजार समितीत 500 नगांची आवक झाली. यात एक जुडीला कमीत कमी पाच रुपयांचा भाव मिळाला. तर जास्तीत जास्त दहा रुपये प्रति जोडीला भाव मिळाला. आणि सरासरी प्रति जुडीला आठ रुपयांचा भाव मिळाला. कल्याण बाजारात देखील मेथीच्या प्रती जुडीला दहा रुपये जास्तीत जास्त 17 रुपये तर सरासरी 13 रुपये असा दर मिळाला. पुणे लोकल बाजारात जवळपास 75 हजार 750 मेथीच्या जोडीची आवक झाली. मात्र या ठिकाणी देखील बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. मेथीच्या जुडीला कमीत कमी आठ रुपये जास्तीत जास्त दहा रुपये आणि सरासरी नऊ रुपये असा दर मिळाला.

टॅग्स :मार्केट यार्डनाशिकशेती