Kharif sowing गतवर्षी अत्यल्प पावसामुळे तूर, उडीद, मूग (Moong, Urad price) पिकाचे उत्पादन कमी झाले होते. यामुळे या पिकाला चांगला दर मिळाला होता. यावर्षीही तूर, उडीद आणि मूग पिकाला मागणी अधिक असण्याची शक्यता असल्याने यावर्षी ही पिके शेतकऱ्यांना मालामाल करतील. गेल्या वर्षी उडीद, मुगाच्या पेरण्या कमी झाल्याने उच्चांकी भाव मिळाला होता.
यंदाही पाऊस समाधानकारक (monsoon) राहिल्यास उडीद, मुगाला चांगला भाव मिळेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत अडत बाजारात उडीद, मुगाला ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये यानुसार दर मिळत आहे. भविष्यात याची आवक वाढल्यास दर कमी-जास्त होऊ शकतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कडधान्य पिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात डाळवर्गीय धान्याची मोठी मागणी असते. दररोजच्या जेवणात डाळीशिवाय जेवण अपुरे आहे. त्यासाठी शेतकरी कडधान्याची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. यामध्ये मूग, उडीद, तूर खरीप हंगामात शेतकरी पेरणी करतात. यावर्षी उडीद व मूग, तुरीला सोयाबीन पेक्षाही जास्तीचा दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग या पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.यंदा सोयाबीनला भाव कमी असून, त्या तुलनेत उडीद, मुगाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे या हंगामात उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ लाख ४ हजार ३७२ हेक्टरवर खरीप पेरा झाला असून जिल्ह्यात सरासरी ६ लाख ८४ हजार हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होत असते. यावर्षीही आतापर्यंत चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरा अंशत: वाढून ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील पंधरा वर्षांत जिल्ह्यातील ज्वारी आणि बाजरीचे क्षेत्र घटले आहे. शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या पिकाकडे पाठ फिरवली. या पिकांची जागा आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस, मका आणि सोयाबीनने घेतली आहे.
पुणे जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर इतके असून, आतापर्यंत १ लाख ६० हजार ६८६ हेक्टरवर अर्थात ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात बाजरी पिकाखालील सरासरी क्षेत्र ४७ हजार ५१८ हेक्टर इतके असून, आतापर्यंत ३६ हजार १८३ हेक्टरवर (७६ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या शिरूर तालुक्यात ३७ हजार ७३५ हेक्टरवर झाल्या आहेत. त्या खालोखाल खेड तालुक्यात ३० हजार ८१० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे.
धुळे जिल्हयात गेल्या दोन वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीनला पसंती होती. मात्र, दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांकडे दोन वर्षांचे सोयाबीन भाव नसल्याने घरीच पडून आहे. यंदाही हीच परिस्थिती राहते की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना जास्तीचा भाव मिळून हाती पैसा खेळत राहील अशी आशा आहे. व्यापाऱ्यांकडूनही सोयाबीनचे भाव वाढतील, याची शाश्वती नसल्याने मूग, उडीद पिकाला चांगला भाव मिळेल. शिरपूर तालुक्यात यंदा तालुक्यामध्ये ७४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली आहे. यात मुगाची ८१० हेक्टर, उडीद ४६९, तूर ७०१ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली आहे. सर्वाधिक ४२ हजार २२ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़.
...तर मिळेल सर्वाधिक भाव
गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील तुरीचा पेरा वाढला आहे. असे असले तरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात कोणत्याही पिकाचे उत्पादन येईपर्यंत काही सांगता येत नाही. एवढेच नव्हे तर आपण म्यानमारमधून तुरीची आयात करतो. तिकडे कसे उत्पादन झाले, हे पाहून नव्या तुरीचा दर ठरतो. असे असले तरी सध्या तुरीला ११ हजारांहून अधिक दर आहे. यामुळे खूपच जास्त उत्पादन झाल्यास हे दर ८ हजारांपर्यंत खाली येतील. तुरीसोबतच उडीद, मुगालाही चांगला दर मिळतो. ही पिके शेतकऱ्यांना मालामाल करतात.
- कन्हैय्यालाल जैस्वाल, संचालक, कृउबा, तथा व्यापारी प्रतिनिधी
कापसाच्या तुलनेत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तूर पीक आहे. तुरीचा पेरा वाढावा, यासाठी कृषी विद्यापीठानेही शेतकऱ्यांना संशाेधित बियाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध केले होते. महाबीजनेही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे दिले. गतवर्षी तुरीला चांगला दर मिळाला होता, यामुळे यावर्षी तुरीचा पेरा दुपटीहून अधिक आहे. शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी.
- आर.एच. ठोंबरे, कृषी अभ्यासक.
सध्या उडीद व मुगाला किमान दर ९ हजार तर कमाल ९ हजार ५०० आहे. डाळवर्गीय पिकाचे दर चढे असल्याने शेतकरी मूग, उडीद पिकाची पेरणी करीत आहेत. मात्र, भविष्यात आवक वाढली तर दर कमी-जास्त होऊ शकतात.
- चंद्रशेखर मुदकण्णा, मुरुम
या बाजारपेठेत उडीद, मूग व तुरीला जास्तीचा दर मिळतो. सोयाबीनचे दर पाच हजारांच्या आत असल्याने शेतकरी उडीद, तूर, मुगाकडे वळले आहेत. भविष्यात डाळीची आयात नाही झाल्यास हे दर दहा हजारांच्या पुढे जाऊ शकतील.
- कमलाकर जाधव, लातूर
दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव मिळत नाही. तर सध्या उडीद, मूग या पिकांना चांगला भाव आहे. खरिपातील उडीद, मूग काढणीनंतर त्यांना चांगले भाव राहतील.
- राजेंद्र भंडारी, शिरपूरयंदा मूग, उडीद या पिकांना आठ हजारांपेक्षा जास्त भाव मिळेल. सोयाबीन दरवाढीची कोणतीही शक्यता नाही. शेतकरी मूग, उडदाकडे वळले असल्याचे चित्र आहे.
- युवराज जैन, शिरपूर.