यंदाच्या हंगामातील मूग बाजारात दाखल झाला आहे. गुरुवारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या मुगाला मुहूर्तावरच ११ हजार ११ रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. बाजार समित्यांत जुन्या मुगाचे दर मात्र ७ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंतच आहेत.
नव्या मुगाला मुहूर्तावर ११ हजार रुपयांवर दर मिळाला असला तरी पुढे मुगाला किती दर मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात मुगाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे.
यंदा वाशिम जिल्ह्यात या पिकाची ७ हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना केवळ १ हजार ५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकरी उन्हाळी हंगामात मुगाच्या पेरणीवर अधिक भर देत असल्याने खरीप हंगामात या पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरणी केलेला मूग आता काढणीवर येत आहे.
काही शेतकऱ्यांनी या पिकाची काढणीही सुरू केली असून, गुरुवारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवा मूग दाखल झाला. मुहूर्तावर या पिकाला ११ हजार ११ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला. तथापि, या मुगाची केवळ २ क्विंटल आवक झाली होती.
जिल्ह्यातील बाजार समित्यात सद्यस्थितीत उन्हाळी हंगामात उत्पादीत झालेल्या मूगाची आवक होत आहे. येत्या काही दिवसात मात्र खरीप हंगामातील मूगाची आवक बाजारात वाढण्याची शक्यता आहे.