Join us

Moong Market Update : नवीन मुगाची बाजारात सुरु  आवक; काय मिळाले भाव? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 8:23 PM

खरीप हंगामात मुगाची विक्री सुरू झाली आहे. वाचा मुगाला काय मिळाला भाव? (Moong Market Update)

यंदा वेळेवर मान्सून आल्यानंतर खरीप हंगामातील पिकाची पेरणी जून महिन्यात झाली. त्यानंतर अधूनमधून समाधानकारक पाऊस पडला.  मात्र, शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले.

 त्यामुळे प्रतवारी खालावली तर उताऱ्यात घट झाली. अनेक शेतकरी मुगाची विक्री करण्यासाठी येत आहेत. मात्र, दर क्विंटलला पाच हजारांपासून ते साडेसात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीच्या फेऱ्यात शेतकरी भरडला जात आहे.  त्यातच तालुक्यात सिंचनाच्या सोई नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक मदार खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर पिकाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. दोन वर्षांपासून कापूस व सोयाबीन पिकाला अपेक्षित भाव मिळत नाही.

मात्र, सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकाशिवाय पर्याय नाही. जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर मुगाची पेरणी करण्यात आली.  मूग हे पीक ६५ दिवसांत हाती येते.

यंदा मुगाला चांगला उतारा येईल, अशी परिस्थिती होती; परंतु काही भागांत वारा व जोराचा पाऊस पडल्याने मुगाला शेंगा चांगल्या भरल्या नाहीत. परिणामी, मुगाला एकरी जास्तीत जास्त एक क्विंटल उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

मुगाची विक्री करून शेतकरी पोळ्याच्या सणाची खरेदी करतात. काही वर्षांपासून पावसाचा असमोतल वाढत आहे. त्यामुळे मुगाचे क्षेत्र घडत आहे.त्यातच हार्वेस्टरने काढलेल्या मुगाची प्रतवारी घसरत असल्याने मुगाला अपेक्षित भाव मिळत नाही:

परंतु मजुरांच्या साहाय्याने मुगाची काढणी केली, तर मुगाची प्रतवारी चांगली राहत आहे. मात्र, बाजारपेठेत मुगाची आवक होताच भावात घसरण होत आहे.

तालुक्यात ६२,९७९ हेक्टर खरीप क्षेत्र

सेलू तालुक्यात कापूस सर्वाधिक ३३ हजार ३३० हेक्टरवर आहे.  सोयाबीन २३ हजार ९१७ हेक्टर,  तूर ४ हजार ५३७ हेक्टर, मूग ६४० हेक्टर, तर उडीद २८४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

८ हजार ६५२ हमीभाव

खरीप हंगामात मुगाचे अत्यल्प ६४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यातच उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. शासनाने मुगाला ८,६८२ एवढा हमीभाव जाहीर केला आहे; परंतु मुगाच्या प्रतवारीनुसार बाजारपेठेत पाच हजार रुपयांपासून ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

हमीभावाने खरेदी करण्याची मागणी

पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळ्याचा बाजार करण्यासाठी शेतकरी मूग विक्रीसाठी घेऊन येत आहेत. मात्र, हमीभावाप्रमाणे मुगाची खरेदी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुगाची हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रमूगबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड