यावर्षी खरीप हंगामातील पिके चांगली आहेत. मुगाचे चांगले उत्पादन होत आहे. असे असले तरी मुगाचे दर गडगडल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. यावर्षी केंद्र सरकारने मुगाला प्रतिक्विंटल ८ हजार ६८२ रुपये दर दिला. असे असले तरी बाजारात मात्र ६ हजार ते ७ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असाच दर मिळत आहे.
सोयाबीन, कापूसपाठोपाठ मुगाचे दरही गडगडल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे.
मुगाची आवक सुरू; हमीभावापेक्षा कमी भाव
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुगाचे उत्पादन होण्यास सुरुवात झाली. यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग विक्रीसाठी घेऊन येत आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील तीन दिवसांत ५१ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता.
बाजार समितीत काय भाव? (प्रतिक्विंटल)
बा. स. | मूग | सोयाबीन |
छत्रपती संभाजीनगर | ६९५० | ४१३४ |
सिल्लोड | ७६०० | ४२०० |
वैजापूर | ८०६८ | (आवक नाही) |
पैठण | ७१५० | (आवक नाही) |
कन्नड | ७००० | (आवक नाही) |
शासनाने मुगाला प्रतिक्विंटल ८६८२ रुपये हमीभाव दिला
आठ दिवसांपासून शेतकरी विक्रीसाठी मूग बाजारात आणत आहेत. शासनाने मुगाला प्रतिक्विंटल ८ हजार६८२ रुपये हमीभाव दिला आहे, असे असले तरी मुगातील आर्द्रतेच्या प्रमाणानुसार भाव मिळत असतो. आज मुगाला जास्तीत जास्त ८ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. - हरीश पवार, व्यापारी
बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय
गेल्या काही वर्षापासून पिंप्रीराजा परिसरात वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे. हे प्राणी मूग, मका आणि डाळिंबाच्या बागांचेही नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांनी मुगाचा पेरा कमी केला आहे. शासनाने मुगाला हमीभाव दिला असला तरी बाजारात त्यापेक्षा कमी दर मिळत आहे. - कृष्णा पवार, शेतकरी, पिंप्री राजा