शेतकऱ्यांनी उन्हाळयात दुष्काळसदृश्य परिस्थितीत जिवापाड मोसंबी बागा जपल्या त्याला बाजारात आता कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात तरी मोसंबीला चांगला भाव मिळेल का या आशेवर शेतकरी आहेत.
दुष्काळात जिवापाड जोपासलेल्या मोसंबीला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. लाडसावंगी परिसरात मोसंबी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने या परिसराला मोसंबीचे ''माहेरघर'' म्हणून ओळखले जाते. शिवाय मोसंबी खरेदी करून ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या आंबा बहराची मोसंबी विक्रीसाठी तयार झाली आहे. परंतु, बाजारात अवघा दहा ते बारा रुपये किलो दर मिळत आहे. मागील वर्षी मोसंबीला ३० ते ४० रुपये किलोचा दर मिळाला होता.
मागील वर्षी दुष्काळ पडला* लाडसावंगी येथील मोसंबी विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्यापूर्वी छाटणी करून पॅकिंग करून शेतकरी विक्री करत आहेत.
* उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन बागा जोपासल्या होत्या, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी बागा तोडल्या होत्या.
* दुष्काळ व तुटलेल्या मोसंबीच्या बागांमुळे यंदा चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. परंतु निराशाच हाती आली आहे.
उन्हाळ्यात एक लाख खर्चुन पाणी दिले
माझ्याकडे तीन एकरात ७०० मोसंबीची झाडे आहेत. उन्हाळ्यात एक लाख रुपये खर्चुन पाणी विकत आणून बाग वाचवली. सध्या आंबा बहराची मोसंबी विक्रीसाठी तयार झाली. परंतु दहा ते तेरा रुपये किलोचा भाव मिळत आहे. -बाबासाहेब पडूळ, शेतकरी, लाडसावंगी
दर वाढ होईना
परराज्यातील पाऊस कमी होताच भाव वाढतील शेतकऱ्यांकडून मोसंबी खरेदी करून अहमदाबाद, नागपूर, मुंबई, दिल्ली आदी ठिकाणी विकतो. इतर राज्यात सध्या पाऊस जास्त असल्याने मोसंबी विक्रीसाठी नेता येत नाही. स्थानिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत नाही. पाऊस कमी होताच भाव वाढतील. - युसूफ बागवान, मोसंबी व्यापारी, लाडसावंगी