Join us

Mosambi Market : मोसंबी बाजारपेठेत "इतके" टनांची आवक; प्रतिटन मिळतोय "हा" भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 2:24 PM

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी मार्केटमध्ये Mosambi Market :

Mosambi Market :

जालना  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी मार्केटमध्ये शनिवारी मोसंबीची तब्बल ४५० टनाची आवक झाली आहे. शेतकऱ्यांच्या मोसंबीला प्रति टनास १५ ते २१ हजार रुपयांचा दर मिळत आहे.

आंबे बहराच्या या मोसंबीची यावर्षी प्रचंड फळगळ झाली असून, यामुळे मोसंबी उत्पादकांची मोठी निराशा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जालना तालुक्यामध्ये कारला पंचक्रोशी हा मोसंबीचा बेल्ट समजला जातो.

या हंगामात मात्र येथेही प्रचंड मोसंबीची फळगळ झाल्यामुळे उत्पादक अडचणीत सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबीच्या बागा काढून दुसरा काही पर्यायी मार्ग मिळतो का याचा शोध घेत आहेत.

व्यापारी - शेतकरी म्हणतात

मोसंबीचे उत्पादन सुरू होण्यासाठी साधारणतः सात ते आठ वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर कुठे उत्पादन सुरू होते. तरी देखील शेतकऱ्यांच्या हाताला काहीच मिळत नसेल तर, मग मोसंबीच्या बागा राखून काय करायचे, मोसंबीला किमान ३० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळायला हवा, मोसंबीची यावर्षी झालेली वाताहत बघता मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासन स्तरावरून मिळावी. - नारायण पांडुळे, शेतकरी.

जिल्ह्यातील मोसंबीला उत्तर भारतात मागणी आहे; परंतु पावसामुळे पाहिजे तसा उठाव होत नाही. येत्या काळात मोसंबीचे दर वाढू शकतात. यावर्षी जवळपास एक महिना अगोदर मोसंबी विक्रीसाठी बाजारात दाखल झाली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या मोसंबीला प्रति टनाला २० ते २१ हजार रुपये भाव येतील, असे मोसंबी मार्केटमध्ये मिळत आहे. - नाथा घनघाव, अध्यक्ष, मोसंबी अडत असोसिएशन, जालना.

टॅग्स :शेती क्षेत्रफळेबाजारशेतकरीशेती