अनिलकुमार मेहेत्रे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या लिलावात आंबा बहार मोसंबीला प्रति टन १८ हजार रुपयांचा यंदाचा सर्वोच्च दर मिळाला. या लिलावात शेतकऱ्यांनी तब्बल ३५० टन मोसंबी विक्रीसाठी आणली होती.
पाचोड येथील मार्केटमध्ये मोसंबी खरेदीसाठी मुंबई, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कलकत्ता, बिहार, दिल्ली, आदी ठिकाणचे व्यापारी नियमित येतात. गुरुवारी सकाळपासून येथील मार्केटमध्ये अंबा बहार मोसंबीची आवक वाढली होती. सकाळी ११ वाजता लिलावास सुरुवात झाली.
त्यानंतर लिलावात शेतकऱ्यांच्या मोसंबीला सर्वांत कमी १३ हजार रुपये प्रतिटन दर शेतकऱ्याला मिळाला. त्यानंतर पाचोड येथील शेतकरी राहुल भोसले यांच्या मोसंबीला १८ हजार रुपये दर मिळाला.
दिवसभरात येथे ३५० टन मोसंबी विक्रीसाठी आली होती. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आंबा बहार मोसंबीला २५ हजार रुपये प्रति टनचा सर्वोच्च भाव मिळाला होता. यावर्षी किमान एवढा तरी भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोसंबीची साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी हा आकडा वाढेल, अशी शेतकरी, व्यापाऱ्यांना प्रतीक्षा आहे.
गळ सुरु झाल्याने आवक वाढली
• शेतकऱ्यांच्या मोसंबीला सध्या गळ सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
• नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकरी पाचोडच्या मार्केटमध्ये मोसंबी आणत आहे.
• त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोसंबीला कमी भाव मिळत असल्याचे व्यापारी शिवाजी भालसिंगे यांनी सांगितले. त्यात मोसंबी तोडण्यासाठी मजुरांची टंचाई भासत असल्याचेही ते म्हणाले.