शरद झावरेपारनेर: शासनाने मुगासाठी प्रतिक्विंटल ८ हजार ६६२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलनेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी आर्थिक लूट होत आहे.
मात्र अद्याप हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला हमीभाव मूग खरेदी केंद्रासाठी मुहूर्त कधी मिळेल, असा सवाल शेतकरी करत आहेत.
सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा मूगबाजारात विक्रीस येत आहे. विशेषतः नगर, पारनेर बाजार समितीत मूग विक्रीस येत आहे. बाजार समितीच्या आवारात मूग व सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू होणे अपेक्षित आहे.
मात्र अद्यापपर्यंत खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. गेल्या काही वर्षात हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाते. मात्र त्याला कमालीचा उशीर होतो. तोपर्यंत अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचा मूग विक्री झालेला असतो.
यंदाही सरकार वरातीमागून घोडे, असे तर करणार नाही ना, असा सवाल शेतकरी करत आहेत. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. आर. आभाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शेतकऱ्यांकडील मूग संपल्यावर खरेदी केंद्र सुरू करणार का?- एकीकडे सरकारने मुगाला प्रतिक्विंटल ८ हजार ६६२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे.- दुसरीकडे मात्र मनमानी भाव लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.- एक नंबरच्या मुगाला व्यापाऱ्यांकडून ७ हजार रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.- शेतकऱ्यांकडील मूग संपल्यावर फेडरेशन बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करणार का, असा सवालही भाळवणी येथील शेतकरी भाऊसाहेब लक्ष्मण रोहकले यांनी केला आहे.
ई-समृध्दी पोर्टलवर क्यूआर कोड नोंदणीमहाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई व नाफेड यांच्या माध्यमातून तूर, मूग, उडीद, मका, चणा, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी समृद्धी पोर्टलवर एक क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. परंतु, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून बाजार समितीत मूग खरेदी केंद्रच सुरू झालेले नाही.