Join us

Mug Bajarbhav : पावसामुळे मुगाच्या उत्पादनात घट कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 1:09 PM

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने उत्पादनात घट झाली आहे.

सोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामातील ७० टक्के मुगाची विक्री झाली आहे.

आणखी ३० टक्के माल शेतातच आहे. सोयाबीनचा दर सध्या कमी आहे. मात्र, मुगामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. सध्या चांगल्या दर्जाच्या मुगाला प्रतिक्विंटल आठ हजारांचा दर मिळत आहे. सरासरी दर ७५०० रुपये मिळत आहे.

मुगाची आवक सुरू; हमीभावापेक्षा दर कमी जास्तखरिपातील मुगाची आवक मागील महिनाभरापासून सुरू आहे. काढणीदरम्यान सतत पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पावसामुळे माल खराब येत आहे. त्यामुळे दर कमी-जास्त होत आहे. मागील काही दिवसांपासून मुगाला आठ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभावापेक्षा सोलापुरात जास्त दर मिळत आहे.

भाव आणखी वाढण्याची शक्यतामुगाला चांगला दर मिळत आहे. येणाऱ्या काळात दर्जेदार माल येण्याची शक्यता आहे. कारण, अनेक शेतकरी माल ठेवून आणि चाळणी करून स्वच्छ दर्जेदार माल आणतात. त्यामुळे येणाऱ्या काळात दर ९ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शिवाय आवक घटल्यास भाव १० हजारांपर्यंतही जाईल, असे व्यापारी सांगतात.

सोयाबीनच्या दरात मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. आता दर साडेचार हजारांपर्यंत गेला आहे. नवीन माल अद्याप बाजारात आलेला नाही. मुगाची आवक चांगली होती. आता कमी होत आहे. त्यामुळे दरात वाढ झालेली आहे. - बसवराज इटकळे, भुसार व्यापारी

सध्या मुगाला दर मिळत आहे. मात्र, पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. रास करतानाच पाऊस पडल्याने माल खराब झालेला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा दर कमी मिळाला आहे. आता दरात वाढ होत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे माल नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. - शिवपुत्र बिराजदार, शेतकरी

टॅग्स :बाजारमार्केट यार्डमूगशेतकरीशेतीसोयाबीन