नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२३ - २४ मध्ये ११७ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. गतवर्षीपेक्षा ११ कोटी जास्त महसूल मिळविण्यास प्रशासनाला यश आले आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या मुंबई बाजार समितीमध्ये वर्षाला ८ ते १० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.
कांदा, मसाला, धान्य, फळ व भाजीपाला या पाच प्रमुख बाजारपेठांचा बाजार समिती आवारात समावेश होतो. २०२२ २३ मध्ये बाजार फी व इतर मार्गाने बाजार समितीला १०६ कोटीचे उत्पन्न झाले होते. यामध्ये वाढ करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
वर्षभरात ११७ कोटीचे उत्पन्न प्राप्त केले आहे. यामध्ये बाजार फीच्या माध्यमातून ८७ कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये बाजार फी च्या माध्यमातून ८४ कोटी रुपये मिळविण्यात आले होते.
शासनाने फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा शेतमालाचे नियमन फक्त मार्केटपुरते मर्यादीत केले आहे. सुकामेवा, साखर, रवा, मैदासह अनेक वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. यानंतरही महसूल वाढविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
वर्षभरात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची ४५ लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात यश आल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.